India vs West Indies ODI match ब्रिजटाऊन : वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल, तर यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी इशान किशन आणि संजू सॅमसन यांमध्ये चुरस पहायला मिळेल.भारतीय संघ आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी या मालिकेच्या माध्यमातून खेळाडूंचे योग्य संयोजन बसवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही कसोटी सामन्यांप्रमाणेच भारताचे पारडे एकदिवसीय मालिकेतही जड राहणे अपेक्षित आहे. मात्र, मालिकेत सूर्यकुमार, इशान, सॅमसन, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिकसारख्या खेळाडूंवर विशेष लक्ष राहणार आहे.

ट्वेन्टी-२० प्रारूपातील आपली लय एकदिवसीय सामन्यांमध्ये कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमारचा प्रयत्न जायबंदी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या स्थानावर आपली दावेदारी भक्कम करण्याचा राहील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन सामन्यांत पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या सूर्यकुमारला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशान आणि सॅमसनकडे यांच्याकडे दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्थान मजबूत करण्याची संधी आहे. तसेच, विश्वचषक स्पर्धेपूर्वी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. या वेळी अधिक संधी मिळण्याची अपेक्षा सॅमसनला असेल. कसोटी मालिकेत चमक दाखवणाऱ्या इशानला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्यक्रमासाठी सॅमसन व सूर्यकुमार यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, फॅनकोड अ‍ॅप