रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी खाते उघडले आहे. या सामन्यात भारताने ६ गड्यांनी विंडीजला धूळ चारली. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने २० षटकात ७ बाद १५७ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकात पूर्ण केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

विंडीजच्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन या भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत १९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४० धावा चोपल्या. रोहित-इशानने ६४ धावांची सलामी दिली. रोस्टन चेसने ही सलामी फोडली. त्याने रोहितला ओडियन स्मिथकरवी झेलबाद केले. त्यानंतर चेसने किशनला (३५) बाद केले. विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. फॅबियन एलनने विराटला (१७) तंबूत धाडले. या पडझडीनंतर व्यंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरला. या दोघांनीच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३४ तर अय्यरने २ चौकार आणि एका षटकारासह २४ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – VIDEO : विराटच्या सांगण्यावरून रोहितनं घेतला DRS; पंचांनी दिला होता WIDE!

वेस्ट इंडीजचा डाव

ब्रँडन किंग आणि काईल मेयर्स यांनी विंडीजच्या डावाची सुरुवात केली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने किंगला (४) स्वस्तात बाद केले. त्यानंतर निकोलस पूरनसोबत मेयर्सने भागीदारी रचली. मेयर्सने ७ चौकारांसह ३१ धावा केल्या. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने ही मेयर्सला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर पदार्पणवीर रवी बिश्नोईने रोस्टन चेसला (४) पायचीत पकडत आपली पहिली आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट घेतली. याच षटकात त्याने रोवमन पॉवेलला (२) झेलबाद केले. वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्याच गोलंदाजीवर अकिल होसेनला (१०) तंबूत धाडले. ९० धावांवर विंडीजने ५ फलंदाज गमावले. त्यानंतर पूरनने कप्तान कायरन पोलार्डला सोबत घेत आक्रमक फटकेबाजी केली. १८व्या षटकात हर्षल पटेलने पूरनचा अडथळा दूर केला. पूरनने ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६१ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकात पोलार्डने मोर्चा सांभाळत फटकेबाजी केली. ओडियन स्मिथ डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. रोहितने त्याचा सुंदर झेल घेतला. पोलार्डने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २४ धावा केल्या. २० षटकात वेस्ट इंडीजने ७ बाद १५७ धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, यजुर्वेंद्र चहल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडीजः ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरान पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल.