दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी

पहिल्या एकदिवसीय सामन्यांमधील चुकांमधून धडा घेत भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. त्यामुळे बुधवारी होणारा तिसरा ट्वेन्टी-२० सामना निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे हा सामना जो जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे.

दुसऱ्या सामन्यात बरिंदर सरण आणि जसप्रीत बुमरा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. त्याचबरोबर मनदीप सिंग आणि के. एल. राहुल यांनी अभेद्य सलामी देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा सामन्यात असेल. पण अन्य युवा खेळाडूंना मात्र अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना अखेरची संधी

असू शकते. त्याचबरोबर कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झिम्बाब्वेने दुसरा सामना गमावला असला तरी त्यांच्यासाठी तिसरा सामना जिंकत ऐतिहासिक मालिका विजयाची संधी आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. सिकंदर रझा, एल्टन चिगंबुरा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.ह्ण संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टिरक्षक), लोकेश राहुल, फैझ फझल, करुण नायर, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, मनदीप सिंग, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, धवल कुलकर्णी, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, जयंत यादव.

झिम्बाब्वे : ग्रॅमी क्रीमर (कर्णधार), वुसीमुझी सिबांडा, सिकंदर रझा, एल्टन चिगंबुरा, हॅमिल्टन मसाकाझा, वेलिंग्टन मसाकाझा, तेंदाई चटारा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो, माल्कम वॉलर, पीटर मूर, तपिवा मुफुझा, टिनोटेंडा मुटोंबोझी, रिचमंड मुटुम्बामी (यष्टिरक्षक), तौराई मुझाराबानी, ब्रायन चारी, नेव्हिले मॅडझिव्हा, टायमीसेन मारूमा.

सामन्याची वेळ : दुपारी ४.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : टेन ३, डीडी राष्ट्रीय वाहिन्यांवर.