India W vs Australia W: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारताचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव ४८.५ षटकात ३३० धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून सलामीला आलेल्या प्रतिका रावल आणि स्मृती मन्धानाने दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान या सामन्यात असं काही घडलं जे क्वचितच घडतं.

भारताला फुकटात मिळाल्या ५ धावा

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाकडून २९ वे षटक टाकण्यासाठी सदरलँड गोलंदाजीला आली. त्यावेळी प्रतिका रावल स्ट्राइकवर होती. सदरलँडने ऑफ साईडच्या दिशेने स्लोवर चेंडू टाकला. या चेंडूवर प्रतिकाने स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न फसला. त्यावेळी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. हा चेंडू अडवणं फार कठीण नव्हतं. पण चेंडू टप्पा पडून फिरला. त्यामुळे यष्टिरक्षकाला अंदाज आला नाही. हा चेंडू हेल्मेटला जाऊन लागला. त्यामुळे भारतीय संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा मिळाल्या. पण हे पाहून ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक आणि फलंदाजालाही हसू आवरलं नाही.

फलंदाजी करत असलेल्या संघाला मिळतात ५ धावा

क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक जेव्हा हेल्मेटचा वापर करत नाही, त्यावेळी ते यष्टिरक्षकाच्या मागे ठेवतात. हे हेल्मेट मैदानात कुठेही ठेवता येत नाही. यष्टिरक्षकाच्या मागे असलेल्या हेल्मेटला जर चेंडू जाऊन लागला तर एमसीसीच्या नियमानुसार फलंदाजी करत असलेल्या संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा दिल्या जातात.

भारतीय संघाने उभारला ३३० धावांचा डोंगर

भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या प्रतिका रावलने ७५ आणि स्मृती मन्धानाने ८० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५५ धावा जोडल्या. तर हरलिन देओलने ३८, कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ३३, यष्टिरक्षक ऋचा घोषने ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३३० धावा केल्या.