भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय; शिखर धवनचे झंझावाती अर्धशतक, रवीचंद्रन अश्विनचे तीन बळी
पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातील मानहानीकारक पराभव आणि चहूबाजूंनी झालेल्या टीकेची मरगळ झटकत भारताने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी मात केली आणि पराभवाची परतफेड केली. सलामीवीर शिखर धवनने जलद अर्धशतक झळकावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर फलंदाजांनी दमदार खेळी साकारत १९६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फिरकीपटू अश्विनने १४ धावांत तीन बळी घेण्याची किमया साधली. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी करत आव्हान जिवंत राखले आहे.
प्रथम फलंदाजी करताना धवन आणि रोहित शर्मा यांनी ७५ धावांची सलामी देत पहिल्या सामन्यात नावाजलेल्या श्रीलंकेची गोलंदाजी बोथट केली. या दोघांनी पहिल्या सामन्यात झटपट बाद झाल्याची सव्याज परतफेड यावेळी केली. गेल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या रोहितने या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर रोहितपेक्षा धवन अधिक आक्रमक दिसला. धवनने फक्त २५ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रोहितने दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावा केल्या. धवन बाद झाल्यावर रोहित आणि अजिंक्य रहाणे (२५) या मुंबईकरांनी संघाची धावगती कायम राखण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आता मोठी धावसंख्या वाटणार असे वाटत असानाच पाच धावांच्या फरकाने हे दोघेही बाद झाले. त्यानंतर सुरेश रैना (३०) आणि हार्दिक पंडय़ा (२७) यांनी तडफदार फलंदाजी करत संघाचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. अखेरच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाज मोठे फटके मारायला गेले आणि थिसारा परेराला हॅट्ट्रिक मिळाली. परेराने १९व्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे पंडय़ा, रैना आणि युवराज सिंग (०) यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने ३ बाद १६ अशी दयनीय अवस्था केली होती. फिरकीपटू आर. अश्विनने पहिल्याच चेंडूवर तिलकरत्ने दिलशानला भोपळाही फोडू न देता धोनीकरवी यष्टीचीत केले. त्यानंतर दोन्ही बळी मध्यमगती गोलंदाज आशीष नेहराने मिळवत श्रीलंकेला पिछाडीवर ढकलले. पण त्यानंतर दिनेश चंडिमल (३१) आणि चमारा कपुगेदरा (३२) यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. पण डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने या दोघांनाही १२व्या षटकात बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. हे दोघे बाद झाल्यावर श्रीलंकेच्या विजयाची आशा मावळली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेरच्या षटकांसाठी राखून ठेवले होते
आणि त्यानेही तिखट मारा करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
भारताकडून अश्विनने तीन बळी मिळवले, तर नेहरा, जडेजा आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. व गो. चमीरा ४३, शिखर धवन झे. चंडिमल गो. चमीरा ५१, अजिंक्य रहाणे झे. दिलशान गो. सेनानायके २५, सुरेश रैना झे. चमीरा गो. परेरा ३०, हार्दिक पंडय़ा झे. गुणतिलका गो. परेरा २७, महेंद्रसिंग धोनी नाबाद ९, युवराज सिंग झे. सेनानायके गो. परेरा ०, रवींद्र जडेजा नाबाद १, अवांतर (लेगबाइज १, वाइड ९) १०, एकूण २० षटकांत ६ बाद १९६.
बाद क्रम : १-७५, २-१२२, ३-१२७, ४-१८६, ५-१८६, ६-१८६.
गोलंदाजी : कासून रजिंता ४-०-४५-०, थिसारा परेरा ३-०-३३-३, सचित्रा सेनानायके ४-०-४०-१, दुश्मंता चमिरा ४-०-३८-२, मिलिंडा सिरीवर्धना १-०-६-०, दासून शनाका १-०-१२-०.
श्रीलंका : दुशांता गुणतिलका झे. धोनी गो. नेहरा २, तिलकरत्ने दिलशान झे. धोनी गो. अश्विन ०, सीकुगे प्रसन्ना झे. युवराज गो. नेहरा १, दिनेश चंडिमल यष्टीचित धोनी गो. जडेजा ३१, चमारा कपुगेदरा झे. पंडय़ा गो. जडेजा ३२, मिलिंडा सिरीवर्धना नाबाद २८, दासून शनाका झे. रैना गो. अश्विन २७, थिसारा परेरा झे. रहाणे गो. अश्विन ०, सचित्रा सेनानायके पायचीत गो. बुमराह ०, दुश्मंता चमिरा त्रि. गो. बुमराह ०, कासून रजिंथा नाबाद ३, अवांतर (वाइड ३) ३, २० षटकांत ९ बाद १२७.
बाद क्रम :१-२, २-३, ३-१६, ४-६८, ५-६८, ६-११६, ७-११७, ८-११९, ९-११९.
गोलंदाजी : आर. अश्विन ४-०-१४-३, आशीष नेहरा ३-०-२६-२, युवराज सिंग ३-०-१९-०, रवींद्र जडेजा ४-०-२४-२, सुरेश रैना २-०-२२-०, जसप्रीत बुमराह ३-०-१७-२, हार्दिक पंडय़ा १-०-५-०.

सामनावीर : शिखर धवन.