Dream11 Indian Cricket Team Sponsor: ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर, पैशावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या ड्रीम११ ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे की, ते आता भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही. दरम्यान दुबईमध्ये आशिया चषक स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे शिल्लक राहिल्याने, भारतीय क्रिकेट संघाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागेल. ड्रीम११ च्या या निर्णयामुळे बीसीसीआयचे ११९ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “ड्रीम११ च्या प्रतिनिधीने बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांना कळवले की, ते इथून पुढे भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर करू शकणार नाहीत. यामुळे ड्रीम११ आता आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाचे स्पॉन्सर असणार नाही. आता नव्या प्रायोजकासाठी बीसीसीआय लवकरच एक नवीन निविदा जारी करणार आहे.”
ड्रीम११ ला दंड नाही
दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, करारातून माघार घेतल्याबद्दल ड्रीम११ ला दंड आकारला जाणार नाही. करारात अशी तरतूद आहे की, जर सरकारने आणलेल्या कोणत्याही कायद्यामुळे स्पॉन्सरच्या मुख्य व्यवसायावर परिणाम झाला तर ते बीसीसीआयला “कोणतीही भरपाई देण्यास जबाबदार” असणार नाहीत.
३५८ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार
ड्रीम११ १८ वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते आणि ब्लूमबर्गनुसार त्याचे मूल्यांकन ८ अब्ज डॉलर्स आहे. जुलै २०२३ मध्ये ३५८ कोटी रुपयांच्या तीन वर्षांच्या करारात त्यांनी बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सर होण्याचे अधिकार मिळवले होते.
धोनी, रोहित, हार्दिक, पंत आणि बुमराह ब्रँड अँबेसेडर
ड्रीम११ चे आयपीएलमध्येही मोठे अस्तित्व आहे. त्याचे विविध फ्रँचायझींसोबत करार आहेत. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक अव्वल खेळाडू त्याचे ब्रँड अँबेसेडर आहेत. २०२० मध्ये, चिनी कंपनी विवोने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर ते आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनले होते.
भारताबाहेरही ड्रीम११ चा व्यवसाय
ड्रीम११ चा व्यवसाय भारताबाहेरही पसरलेला आहे. ते कॅरिबियन प्रीमियर लीगचा अधिकृत फॅन्टसी पार्टनर आहेत तसेच न्यूझीलंडच्या स्थानिक टी२० स्पर्धा सुपर स्मॅशचे टायटल स्पॉन्सर आहेत. ते ऑस्ट्रेलियाची स्थानिक टी२० स्पर्धा बिग बॅश लीग आणि महिला बिग बॅश लीगशी देखील संबंधित आहेत. २०१८ मध्ये, ड्रीम११ ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत भागीदारीची घोषणा केली होती.