ओव्हल कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचं पारडं जड मानलं जात होतं. इंग्लंडचा संघ मालिका ३-१ जिंकणार अशी भाकितं वर्तवली जात होती. यातच प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. परंतु या कशाचाही परिणाम होऊ न देता शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पाचव्या आणि अंतिम दिवशी ३५ धावांचा यशस्वी बचाव करत ६ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या विजयात संपूर्ण संघाचं योगदान असलं तरी पाच शिलेदारांनी सामन्याचं पारडं फिरवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
मियाँ मॅजिक

इंग्लंड दौऱ्यासाठी संघनिवडीची चर्चा झाली तेव्हा सगळ्यात आधी जसप्रीत बुमराह खेळणार का याविषयी चर्चा सुरू झाल्या. दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंट यामुळे बुमराह पाचपैकी तीनच कसोटी खेळेल हे स्पष्ट झालं. चर्चेचा केंद्रबिंदू जसप्रीत बुमराह होता कारण तो मुख्य अस्त्र होता. बुमराह असण्या नसण्याच्या चर्चा रंगत असताना मोहम्मद सिराजने सर्वस्व झोकून देत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सिराजने या कसोटीत ९ विकेट्स पटकावत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने वळवलं. वेगवान गोलंदाजांना दुखापती सतावतात. मात्र त्यांची पर्वा न करता सिराजने पाचही सामने खेळत २३ विकेट्स घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. यॉर्कर, उसळते चेंडू, वॉबल सिम अशा विविधांगी अस्त्रांचा प्रभावी उपयोग करत सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणले.

शुबमन गिलचं नेतृत्व

इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुबमन गिलची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरून निवडसमितीवर टीका झाली. गिलकडे पुरेसा अनुभव नाही यावरूनही बोललं गेलं. मात्र शुबमनने पहिल्याच मालिकेत कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून खणखणीत कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारतीय संघ पिछाडीवर असताना गिलने गोलंदाजीत योग्य बदल केले. गोलंदाजांनी आखलेल्या रणनीतीनुसार क्षेत्ररक्षण सजवलं. गोलंदाजांशी सातत्याने चर्चा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना सापळे रचून बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुनभवी असूनही गिलने उत्तम कर्णधार असल्याचं या मालिकेद्वारे सप्रमाण सिद्ध केलं. मालिकेत धावांची टांकसाळ उघडत गिलने ७५४ धावा करत असंख्य नवे विक्रम रचले. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असतानाही गिलने तडाखेबंद खेळी साकारत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.

यशस्वी जैस्वालचं मोलाचं शतक

पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने झळकावलेलं शतक क्रिकेटचाहत्यांचा चिरंतन स्मरणात राहील. भारतीय संघाने पहिल्या डावात २२४ धावाच केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव २४७ धावांतच आटोपला होता. तिसऱ्या डावात निर्णायक शतकी खेळी करत यशस्वीने ओव्हलवरच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर यशस्वीला पुढच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी खेळी करता आली नव्हती. मात्र पाचव्या कसोटीत यशस्वीने १४ चौकार आणि २ षटकारांसह ११८ धावांची खेळी केली. या खेळीमुळेच भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांची मजल मारली.

रवींद्र जडेजा-वॉशिंग्टन सुंदर

या अष्टपैलू जोडीने ओव्हल विजयात दिमाखदार योगदान दिलं. दुसऱ्या डावात दोघांनीही प्रत्येकी ५३ धावा केल्या. या अर्धशतकांमुळे भारतीय संघाने पावणेचारशे धावांची वेस ओलांडली. यामुळे भारताला इंग्लंडसमोर ३७४ धावांचं आव्हानात्मक लक्ष्य देता आलं. यशस्वीचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. मात्र जडेजा-वॉशिंग्टन जोडीने ही कसर भरून काढली.

प्रसिध कृष्णा

अंशुल कंबोजऐवजी संधी मिळालेल्या प्रसिध कृष्णाने ८ विकेट्स पटकावत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. आधीच्या सामन्यांमध्ये प्रसिधच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भरपूर धावा लुटल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. त्याच्याऐवजी अंशुल कंबोजला स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याला पदार्पणात चांगली कामगिरी करता आली नाही. ओव्हल कसोटीत अंशुलऐवजी प्रसिध संघात परतला आणि त्याने सिराजला तोलामोलाची साथ देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडचा बिनीचा शिलेदार बेन डकेट, रनमशीन जो रूट यांना बाद करत कृष्णाने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. उसळत्या चेंडूंचा खुबीने उपयोग करून घेत कृष्णाने सातत्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं.