पीटीआय, एंटवर्प (बेल्जियम)
भारतीय पुरुष हॉकी संघाची ‘एफआयएच’ प्रो लीगच्या युरोप टप्प्यातील निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. रविवारी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून २-३ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारताला यापूर्वी नेदरलँड्स व अर्जेंटिनाकडूनही पराभूत व्हावे लागले. हे सर्व सामने चुरशीचे झाले. आपला ४००वा सामना खेळणारा माजी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगला संघाला प्रेरित करण्यात अपयश आले. भारतासाठी संजय (तिसऱ्या मिनिटाला) आणि दिलप्रीत सिंग (३६व्या मि.) यांनी गोल केले. तर, ऑस्ट्रेलियासाठी टिम ब्रँड (चौथ्या मि.), ब्लॅक गोवर्स (पाचव्या मि.) व कूपर बर्न्स (१८व्या मि.) यांनी गोलची नोंद केली.
भारताने सकारात्मक सुरुवात करताना सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. संजयने सुरुवातीच्या पेनल्टी कॉर्नरच्या रिबाऊंडवर गोल केला. मात्र, संघाला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही. एका मिनिटानंतर ऑस्ट्रेलियाने गोल करीत बरोबरी साधली. भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला हा गोल रोखण्यात अपयश आले. यानंतर गोवर्स गोल करीत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. बर्न्सने सामन्याच्या १८व्या मिनिटाला गोल करताना संघाची आघाडी ३-१ अशी केली. पाठकने काही चांगले बचाव करीत ऑस्ट्रेलियाला आणखी आघाडी घेण्यापासून रोखले.
भारताला सामन्याच्या २७व्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, या दोन्ही संधी संघाने गमावल्या. मध्यंतरानंतर सामन्याच्या ३६व्या मिनिटाला शिलानंद लाकडा व अभिषेकच्या मदतीने दिलप्रीत सिंगने गोल करीत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारताच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. भारताचा सामना आता २१ जूनला बेल्जियमशी होणार आहे.
महिला हॉकी संघाचीही निराशा
भारताच्या महिला हॉकी संघाने प्रो लीग सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-२ अशी हार पत्करली. ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिलांचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्यापूर्वी, शुक्रवारी भारताला २-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. वैष्णवी फाळकेच्या मैदानी गोलच्या मदतीने भारताने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाकडून सामन्याच्या ३७व्या मिनिटाला एली लॉटनने गोल करीत बरोबरी साधली. सामन्याच्या ६०व्या मिनिटाला लॅक्सी पिकरिंगने पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे भारताच्या पदरी निराशा पडली.