कोलकातावर पाच गडी राखून मात; वेंकटेशचे शतक वाया
अन्वय सावंत
मुंबई : सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर पाच गडी आणि १४ चेंडू राखून मात केली. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने (५१ चेंडूंत १०४ धावा) केलेले शानदार शतक व्यर्थ ठरले.
वानखेडे स्टेडियमवर दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात कोलकाताने दिलेले १८६ धावांचे लक्ष्य मुंबईने १७.४ षटकांत गाठले. हंगामाची सुरुवात दोन पराभवांनिशी केल्यानंतर मुंबईच्या संघाने दमदार पुनरागमन केले असून हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. इशान किशन (२५ चेंडूंत ५८) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (२५ चेंडूंत ४३) यांना सूर गवसल्यामुळेही मुंबईला दिलासा मिळाला. गोलंदाजीत फिरकीपटू हृतिक शौकिनने सर्वाधिक दोन बळी, तर चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
या सामन्यात सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या दुसऱ्याच षटकात कॅमरुन ग्रीनने एन. जगदीशनला बाद केले. रहमनुल्ला गुरबाझ (८) आणि नितीश राणा (५) यांनाही फारशा धावा करता आल्या नाहीत. मात्र, डावखुऱ्या वेंकटेश अय्यरला रोखण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. वेंकटेशने २३ चेंडूंत अर्धशतक, तर ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने १०४ धावांच्या खेळीत सहा चौकार व नऊ षटकार मारले. तो बाद झाल्यावर आंद्रे रसेलने (११ चेंडूंत नाबाद २१) फटकेबाजी करत कोलकाताला ६ बाद १८५ अशा धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
आव्हानाचा पाठलाग करताना किशन आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानावर आलेला रोहित शर्मा (१३ चेंडूंत २०) यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ४.५ षटकांत ६५ धावांची सलामी दिल्यावर रोहितला शार्दूल ठाकूरने बाद केले. यानंतर किशनने सूर्यकुमारच्या साथीने धावसंख्येत भर घालणे सुरू ठेवले. दरम्यान, किशनने हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात किशन वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. किशनने ५८ धावांच्या खेळीत प्रत्येकी पाच चौकार व षटकार मारले. यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्मा (२५ चेंडूंत ३०) आणि टीम डेव्हिड (१३ चेंडूंत नाबाद २४) यांच्या साथीने मुंबईला विजयासमीप नेले. सूर्यकुमार चार चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला; परंतु डेव्हिडने उर्वरित धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १८५ (वेंकटेश अय्यर १०४, आंद्रे रसेल नाबाद २१; हृतिक शौकिन २/३४, कॅमरुन ग्रीन १/२०) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १७.४ षटकांत ५ बाद १८६ (इशान किशन ५८, सूर्यकुमार यादव ४३; सुयश शर्मा २/२७)
अर्जुन तेंडुलकरचे बहुप्रतीक्षित पदार्पण
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुनला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘आयपीएल’मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनने मैदानात उतरताच विक्रमही रचला. ‘आयपीएल’मध्ये खेळलेली सचिन आणि अर्जुन ही पहिली पिता-पुत्राची जोडी ठरली. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्जुनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यातील पहिले आणि तिसरे षटक टाकले. त्याने या दोन षटकांत मिळून १७ धावा दिल्या; परंतु यानंतर अर्जुनला पुन्हा गोलंदाजीची संधी मिळाली नाही.
१९ हजार शालेय मुलींची उपस्थिती
मुंबई इंडियन्सच्या ‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल’ या उपक्रमाअंतर्गत १९ हजार शालेय मुलींना मुंबई-कोलकाता सामन्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला. मुलींना शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
पोटदुखीनंतरही रोहितची फलंदाजी
पोटदुखीमुळे रोहित शर्माने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण केले नाही. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. मात्र, धावांचा पाठलाग करताना रोहितला प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) म्हणून मुंबईने फलंदाजीला उतरवले. रोहितने २० धावा केल्या.