क्रिकेटच्या बरोबरीने फुटबॉलचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोलकाता नगरीत रविवारी भारतीय फुटबॉलच्या वैभवशाली पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. कॉर्पोरेट प्रभृती, बॉलीवूड सितारे आणि क्रिकेटपटू यांच्या मांदियाळीने सजलेल्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पहिल्यावहिल्या हंगामाचा दिमाखदार उद्घाटन सोहळासुद्धा या वेळी रंगणार आहे.
फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १५८व्या स्थानावर आहे. मात्र इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या आयएसएलच्या निमित्ताने जगभरातल्या मातब्बर फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याचे भाग्य भारतीय फुटबॉलरसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. या व्यासपीठाद्वारे भारतीय फुटबॉलपटूंना घसघशीत आर्थिक कमाईची द्वारेही खुली होणार आहेत.
पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचा भाग असलेले आणि ‘प्रतिपेले’ म्हणून फुटबॉलविश्वात परिचित असलेले झिको या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. झिको हे एफसी गोवा संघाच्या प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर संघांचे सहमालक म्हणून आमनेसामने असणार आहेत. त्याच वेळी भारतीय क्रिकेट संघाचा फुटबॉलप्रेमी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवा विराट कोहली मालकाच्या नव्या भूमिकेत अवतरणार आहेत.
याव्यतिरिक्त बॉलीवूडमधील चलनी नाणे असलेला रणबीर कपूर, अभिनय आणि नृत्य यांचा सुरेख मिलाफ साधणारा ऋतिक रोशन, अभिनयासह निर्मित्ती विश्वात दाखल झालेला आणि खेळाची उपजत आवड असणारा जॉन अब्राहम हे बॉलीवूड त्रिकुट आपल्या फुटबॉलप्रेमाचे व्यावसायिक प्रारूपात रुपांतर करण्यासाठी उत्सुक आहेत.
दहा आठवडय़ांच्या या फुटबॉल मैफलीत आठ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. प्रत्येक संघामध्ये सहा विदेशी तर पाच भारतीय खेळाडू असे समीकरण असणार आहे. अॅटलेटिको डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी या तुल्यबळ संघांमध्ये सलामीची लढत होणार आहे.उद्घाटन सोहळ्यात सूरमयी मेजवानी!
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलीम र्मचट आणि सलीम सुलेमान यांच्याकडे आयएसएलच्या उद्घाटन सोहळ्याची सूत्रे आहेत. देशाच्या विविध भागांची ओळख असणाऱ्या सुरांची ओळख या कार्यक्रमाद्वारे केली जाणार आहे. सॉल्ट लेक स्टेडियमवर होणाऱ्या भव्य कार्यक्रमात स्थानिक गायक ब्रिकम घोष आणि ड्रमर शिवामणी आपली अदाकरी सादर करतील. गोव्यातर्फे बोंडो, मुंबईचे तौफिक कुरेशी, केरळाचे चेंडा, दिल्लीचे अस्सम दफरानी आसामी ढाकी आणि पुणेरी ढोल अशी सूरमयी मेजवानी फुटबॉल रसिकांना अनुभवता येणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नृत्याविष्कार सादर करणार आहे. सलीम यांनी रचलेल्या विशेष गायनानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह असंख्य बॉलीवूड तारेतारका, कॉर्पोरेट मंडळी आणि फुटबॉलपटू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2014 रोजी प्रकाशित
आजपासून गोलधमाल!
क्रिकेटच्या बरोबरीने फुटबॉलचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोलकाता नगरीत रविवारी भारतीय फुटबॉलच्या वैभवशाली पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

First published on: 12-10-2014 at 07:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian super league football