scorecardresearch

IND vs AUS: भारताने नोंदवला वनडेतील सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० गडी राखून ऐतिहासिक विजय

IND vs AUS 2nd ODI: भारताविरुद्ध वनडे दोनदा १० विकेट्सने विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. १०० षटकांचा एकदिवसीय सामना अवघ्या ३७ षटकांत संपला.

IND vs AUS 2nd ODI Updates
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २६ षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत १२१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. हा भारतीय संघाचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.

५०-५० षटकांचा हा एकदिवसीय सामना एकूण ३७ षटकांत संपला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. इतकेच नाही एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताविरुद्ध वनडे दोनदा १० विकेट्सने विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. आता मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणारा तिसरा सामना निर्णायक असणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील चेंडू शिल्लक राहण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. डावात २३४ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. यापूर्वी न्यूझीलंडने २०१९ मध्ये ही कामगिरी केली होती. न्यूझीलंडने २१२ चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाचा पराभव केला. याशिवाय एका संघाने भारताविरुद्ध कमीत कमी षटकांत लक्ष्य गाठले आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडने २०१९ मध्ये हॅमिल्टनमध्ये १४.४ षटकात २ गडी गमावून ९३ धावा करून भारताचा पराभव केला होता.

भारताविरुद्ध सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठा विजय –

१.ऑस्ट्रेलिया – २३४ चेंडू, विशाखापट्टणम २०२३
२. न्यूझीलंड – २१२ चेंडू, हॅमिल्टन २०१९
३. श्रीलंका – २०९ चेंडू, डंबुला २०१०
४. श्रीलंका – १८१ चेंडू, हंबनटोटा २०१२
५. श्रीलंका – १७६ चेंडू, धर्मशाळा २०१७

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: ‘… म्हणून आमचा पराभव झाला’; रोहित शर्माने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामन्यातील स्थिती –

नाणेफेक हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. संपूर्ण संघ २६ षटके खेळू शकला आणि केवळ ११७ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने हे छोटे लक्ष्य केवळ ११ षटकांत पूर्ण केले. सलामीवीर मिचेल मार्शने ६६ तर ट्रॅव्हिस हेडने ५१ धावा केल्या. याआधी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ५ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने ३१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद –

मिचेल स्टार्कने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. स्टार्कने ८ षटकात ५३ धावा देत ५ बळी घेतले. ज्यामध्ये रोहित शर्मा, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराजचा समावेश होता. या सामन्यात भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले, त्यात सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहम्म सिराज यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 20:27 IST