पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढय़ संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने गोव्यात आंतरराष्ट्रीय युवा चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अमेरिका, कोरिया, टांझानिया, मलेशिया यांच्यासह भारतीय संघ खेळणार आहे. प्राथमिक गटात सर्व संघ अन्य चार संघांविरुद्ध खेळणार आहेत. गटातील अव्वल अंतिम फेरीत आगेकूच करतील. २५ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
‘१७ वर्षांखालील विश्वचषकासाठी आपली तयारी किती झाली आहे याचा अंदाज या स्पर्धेद्वारे येऊ शकेल. खेळताना तसेच संघटनात्मक पातळीवर कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे याची कल्पना येईल’, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले.
गोव्यातच आशियाई फुटबॉल समितीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी तबरीझ येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. १६ वर्षांखालील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वाटचाल करणाऱ्या चार संघांना १७ वर्षांखालील विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार आहे.