IPL 2019 DC vs SRH : दिल्लीच्या स्टेडियमवर आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने हैदराबादपुढे १३० धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरची ४३ धावांची झुंजार खेळी आणि अक्षर पटेलने केलेली फटकेबाजी (२३*) याच्या जोरावर दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या.

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ त्रिफळाचीत झाला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला माघारी धाडले. शॉ ने ११ चेंडूत २ चौकार लगावत ११ धावा केल्या. भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन दिल्लीकडून आज खेळताना फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर तो स्वीप करण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. त्याने १४ चेंडूत एका चौकारासह १२ धावा केल्या. दिल्लीकरांना चांगल्या कामगिरी अपेक्षा असलेला ऋषभ पंत अवघ्या ५ धावा करून माघारी परतला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. केवळ ७ चेंडू खेळलेला पंत मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. संघात पुनरागमन झालेला राहुल तेवतीया आपली छाप पाडू शकला नाही. तो देखील ७ चेंडूत ५ धावा करून झेलबाद झाला. संदीप शर्माने त्याला परतीचा मार्ग दाखवला.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा डावखुरा परदेशी फलंदाज कॉलिन इन्ग्रॅम यांच्याकडून दिल्लीला अपेक्षा होत्या. मात्र तो ८ धावांवर माघारी परतला आणि दिल्लीला पाचवा धक्का बसला. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर चौकार लागवण्याच्या प्रयत्नात असताना बॅकवर्ड पॉइण्टमध्ये असलेल्या मनीष पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

त्याच्या या पद्धतीने झेल टिपण्याचे समालोचक आणि सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक झाले.

दरम्यान, झटपट गडी बाद होत असताना कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली. पण शेवटची ४ षटके शिल्लक असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याची झुंज संपुष्टात आली. अय्यरने ४१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ४३ धावा केल्या. १ चौकार आणि १ षटकार लगावणारा ख्रिस मॉरिस लवकर झेलबाद झाला. त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर चौकार लगावून रबाडा झेलबाद झाला. अखेर अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या (२३*) जोरावर दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या.