आयपीएलच्या बाराव्या हंगामात विजेतेपदासाठीच्या संग्रामात मुंबई आणि चेन्नईचे संघ समोरासमोर येणार आहेत. हैदराबादच्या मैदानात हा अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नईच्या संघाने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाच्या नावावर आयपीएलची ३ विजेतेपदं जमा आहेत.

बाराव्या हंगामात मात्र मुंबईचं पारडं जड राहिलेलं आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईने चेन्नईवर मात केली आहे. या पार्श्वभूमीवर Loksatta.com ने आपल्या वाचकांना अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारेल हा प्रश्न विचारला होता. याला फेसबूकवर भरभरुन प्रतिसाद देत मुंबईला पसंती दर्शवली आहे. तब्बल ७२ टक्के लोकांनी सामन्यात मुंबई जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. तर २८ टक्के लोकांनी चेन्नई जिंकेल असं मत नोंदवलं आहे. तब्बल १६ हजारापेक्षा जास्त लोकांनी आपलं मत नोंदवलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवरही चाहत्यांनी मुंबईलाच आपली पसंती दर्शवली आहे. १५२ लोकांनी Loksatta.com च्या पोलवर आपलं मत नोंदवलं. यापैकी ६७ टक्के लोकांनी मुंबईला तर ३३ टक्के लोकांनी चेन्नईला विजयाचं दावेदार म्हटलं आहे.

त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.