विल्यम्सनच्या पुनरागमनामुळे हैदराबादची बाजू बळकट

हैदराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात जोस बटलर ‘मंकडिंग’ पद्धतीने धावचीत झाल्यामुळे सामना गमावणाऱ्या राजस्थान रॉयल्ससमोर शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. पहिल्या लढतीत दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागल्यामुळे गुणांचे खाते उघडण्यासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

हैदराबादच्या संघात केन विल्यम्सनचे पुनरागमन झाल्यामुळे त्यांची फलंदाजीची बाजू अधिक बळकट झाली आहे. परंतु विल्यम्सनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यासाठी हैदराबाद संघ व्यवस्थापन रशीद खान, डेव्हिड वॉर्नर, शकिब अल हसन व जॉनी बेअरस्टो यांच्यापैकी कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार, हे पाहणे रंजक ठरेल. भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल व संदीप शर्मा या वेगवान त्रिकुटाला गेल्या सामन्यात नितीश राणा व आंद्रे रसेल यांनी झोडपले होते. त्यामुळे त्यांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

दुसरीकडे राजस्थानचे सलामीवीर बटलर व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी गेल्या लढतीत दमदार सुरुवात केली होती, मात्र मधल्या फळीच्या अपयशामुळे त्यांनी पराभव ओढवून घेतला. चेंडू फेरफारप्रकरणी शिक्षा भोगून संघात परतलेला स्टीव्ह स्मिथ, अष्टपैलू बेन स्टोक्स व राहुल त्रिपाठी यांना जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत धवल कुलकर्णी व कृष्णप्पा गौतम यांनी पंजाबविरुद्ध सुरेख कामगिरी केली होती. त्यांना जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट यांची साथ लाभल्यास राजस्थानला पराभूत करण्यासाठी हैदराबादला कडवा संघर्ष करावा लागेल.

संघ

’ राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.

’ सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेअरस्टो, रिद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १