मुंबई आणि दिल्ली यांच्यातील वानखेडे मैदानावरील सामन्यात दिल्लीने तडाखेबाज खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन (४३), कॉलिन इन्ग्राम (४७) आणि ऋषभ पंत (७८*) या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या सामन्यात २१३ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी २१४ धावांचे आव्हान मिळाले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे फलंदाज सज्ज आहेत. पण या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुंबई इंडियन्सच्या चमूतील सगळ्यात मोठ्या फॅनसाठी लहान आकाराची जर्सी असा उल्लेख करण्यात आला आहे. हा फोटो आहे रोहितच्या चिमुकली समायरा हिच्या जर्सीचा. रोहितची पत्नी रितिकाने हा फोटो काढला आहे.

दरम्यान, सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतला होता. पण त्याचा हा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर पृथ्वी शॉ (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६) झटपट माघारी परतले. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत दिल्लीला बळ दिले. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला गेला. पण दोघेही आपल्या अर्धशतकाला मुकले. पण त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने तुफान धुलाई केली. पंतने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, रसिख सलाम या वेगवेना माऱ्याला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. ऋषभने नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे ही धावसंख्या त्याने केवळ २७ चेंडूत उभारली. ७८ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या या खेळाचे मुंबई इंडियन्सच्या संघाकडूनही कौतुक झाले.