IPL 2019 ही बहुप्रतीक्षित स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र IPL चं उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार आज IPL च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळच्या अंतराने ते काढून टाकण्यात आले.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झालं. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, प्ले ऑफ्स चे सामने आणि अंतिम सामना याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानुसार इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार IPL च्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यात १२ मे या तारखेला अंतिम सामना होणार असे दिसत होते. मात्र काही वेळातच ते वेळापत्रक हटवण्यात आले.

IPLT20.COM वरील स्क्रीनशॉट

 

या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. अशा ‘हाय व्होल्टेज’ सामान्यांनी स्पर्धेची सुरुवात होणार असल्यामुळे सर्वच जण यंदाच्या स्पर्धेकडे डोळे लावून बसले आहेत. या दरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने या स्पर्धेतील टॉप ४ संघ कोणते असतील याबाबत भविष्यवाणी केली आहे.