IPL 2019 RCB vs SRH : यंदाच्या हंगामात सर्वात जास्त पराभव पाहिलेल्या बंगळुरूने हंगामाचा अखेर विजयाने केला. शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना रविवारच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली.

विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी IPL इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. हेटमायरने ४७ चेंडूत ७५ धावा केल्या तर गुरकिरतने ४७ चेंडूत ६५ धावा केल्या.

त्यानंतर अंतिम टप्प्यात फटकेबाजी हे दोघेही बाद झाले. त्यामुळे काही काळ सामन्यात रंगत आली, पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.

बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्यामुळे बंगळुरुला हरवत हैदराबाद बाद फेरी गाठतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.