IPL 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या २ संघांमध्ये आजचा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ख्रिस गेलच्या ७९ धावा आणि सर्फराज अहमदची नाबाद ४६ धावांची खेळी याच्या जोरावर पंजाबने २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आणि राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले.

या सामन्यात यंदाच्या IPL मधील सर्वात महागडा खेळाडू जयदेव उनाडकट याचा समावेश होता. त्याला ८ कोटी ४० लाखांची किंमत देऊन राजस्थानच्या संघाने खरेदी केले. मात्र लिलावात ज्या प्रमाणे महागडा खेळाडू ठरला, तसाच गोलंदाजीतही तो महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकात तब्बल ४४ धावा खर्च केल्या आणि यानुसार त्याने प्रत्येक षटकात सरासरी १४.६६ धावा दिल्या. सुरुवातीला संयमी खेळी करणाऱ्या ख्रिस गेलनेदेखील त्याच्याच षटकात सलग ३ चौकार आणि १ षटकार खेचत अर्धशतक ठोकले. त्यामुळे सोशल मीडियावर उनाडकटची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली.

दरम्यान, पंजाबच्या डावात टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या. या दरम्यान पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला. पण ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची सुरुवात संथ झाली. पंजाबने ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले. गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर २९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. बेन स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पाठोपाठ निकोलस पूरण १२ धावा काढून बाद झाला. पण सर्फराजने २९ चेंडूत धमाकेदार नाबाद ४६ धावांची खेळी केली.

चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स संघातून पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. चेंडूत फेरफार केल्याच्या आरोपावरून बंदीची शिक्षा भोगणारा डेव्हिड वॉर्नर याने IPL मध्ये दमदार पुनरागमन केले. त्यामुळे स्मिथही त्याचीच पुनरावृत्ती करणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.