अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू अजमतुल्ला ओमरझाईने शारजाहमध्ये आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या कामगिरीने छाप पाडली. १५६ धावांचा पाठलाग करताना आयरिश संघाला ९८ धावांत गुंडाळताना त्याने चार विकेट घेत मोठी भूमिका बजावली. सध्या आयपीएल काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ओमरझाईची ही कामगिरी पाहून गुजरातचा संघ नक्कीच सुखावला असेल. आयपीएल लिलावात ओमरझाईला गुजरात टायटन्स संघाने त्याच्या ५० लाखाच्या मूळ किंमतीसह संघात सामील केले आहे. उमरजाई हा एक अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यात पटाईत आहे. त्यामुळे आता त्याच्या रूपात गुजरात टायटन्सला ‘प्रति हार्दिक’ गवसला असं म्हणता येईल.

ओमरझाईने आयर्लंडविरूध्दच्या सामन्यात ४ षटकांत ४ विकेट्स घेत फक्त ९ धावा दिल्या. आयरिश संघाचा आघाडीचा फलंदाज हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल आणि बॅरी मॅककार्थी या तिघांना त्याने झेलबाद केले, तर मार्क एडेअर याला त्रिफळाचीत करत माघारी धाडले. ओमरझाईने त्याच्या टी-२० क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने पहिल्यांदाच टी-२० प्रकारात चार विकेट्स घेतले. अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंतच्या ३६ टी-२९ सामन्यांत २९.८८ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या आहेत. ८.४० हा त्याचा इकॉनॉमी रेट आहे. ओमरझाई हा एक दमदार फलंदाज असून त्याच्या नावावर फॉर्मेटमध्ये २८८ धावा आहेत.

भारतात झालेल्या वनडे विश्वचषकातही त्याने आपली अष्टपैलू खेळी दाखवून दिली. अफगाणिस्तानकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या ओमरझाईने नऊ डावांमध्ये ३५३ धावा केल्या आणि ७ विकेट्सही घेतले. त्याची दक्षिण आफ्रिकेविरूध्दची ९७ धावांची नाबाद खेळी उल्लेखनीय होती. त्याच्या याच शानदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने त्याला आयपीएलमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

यंदाच्या आयपीएलमध्ये शुबमन गिल गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघात परतल्याने त्याच्या जागी कोणता खेळाडू खेळवणार हा मोठा प्रश्न संघासमोर होता. हार्दिक हा संघात अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाला चांगला समतोल राखण्यात मदत होत होती. आता त्याच्या जागी संघ अफगाणिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला ओमरझाईला संधी देऊ शकतो.

ओमरझाई आणि नवीन-उल-हक यांनी मिळून घेतलेल्या सात विकेट्सच्या जोरावर अफगाण संघाने १५६ धावांचा यशस्वी बचाव केला. अफगाणिस्तानने अखेरीस २-१ अशा फरकाने मालिका आपल्या खिशात घातली. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली. इब्राहिम झद्रान आणि मोहम्मद इशाक यांनी संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.
तर झादरानने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. आयर्लंड संघाला अफगाणिस्तानला १५६ धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आयरिश संघाला ९८ धावांवर सर्वबाद केले. फक्त कॅम्फर आणि गॅरेथ डेलनी यांनी २० धावांचा टप्पा ओलांडला.