2019 साली होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी बीसीसीआयने लिलावाच्या तारखा जाहीर केल्या आहे. 18 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये हा लिलाव रंगणार आहे. मात्र यंदाच्या हंगामात आयपीएलची गेल्या 11 वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. खेळाडूंचा लिलाव करणारे रिचर्ड मेडली हे यंदाच्या हंगामात लिलाव करणार नाहीयेत. मात्र यापाठीमागचं कारण बीसीसीआय किंवा मेडली यांनी स्पष्ट केलं नाहीये.

रिचर्ड मेडली यांच्याऐवजी ह्युज एडमेडेस हे बाराव्या हंगामाचा लिलाव करणार आहेत. एडमेडेस हे फाईन आर्ट आणि चॅरिटी ऑक्शनर म्हणून ओळखले जातात. एडमेडेस यांना 30 वर्ष लिलावाचा अनुभव आहे.

अवश्य वाचा – ७० स्थानांसाठी १००३ खेळाडू उपलब्ध

आयपीएलच्या १२व्या पर्वासाठी १८ डिसेंबरला जयपूर येथे होणाऱ्या लिलावासाठी सर्व संघांमधील ७० स्थानांसाठी १००३ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यात उत्तर-पूर्व, उत्तराखंड आणि बिहार राज्यांमधील खेळाडूंचाही समावेश असेल. परदेशातील २३२ खेळाडू या लिलावासाठी उपलब्ध असतील. यापैकी ऑस्ट्रेलियाचे ३५, अफगाणिस्तानचे २७ आणि दक्षिण आफ्रिकेचे ५९ खेळाडू आहेत. लिलावातील ८०० नवख्या खेळाडूंपैकी तब्बल ७४६ खेळाडू हे भारतीयच आहेत.