Fan touching Virat Kohli’s feet and taking his blessings: आयपीएल २०२३ मधील ४३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपरजायंट्सचा १८ धावांनी पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक चाहता मैदानात घुसला. त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला. यादरम्यान कोहलीने जे केले ते हृदयाला भिडणारे होते. कोहली आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सामना आणखी एका कारणाने चर्चेत होता.

लखनऊ आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देत मैदानात प्रवेश केला. काही क्षणात तो कोहलीपर्यंत पोहोचला. चाहत्याने कोहलीच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेतला. हे पाहून कोहलीने त्याला उठवत मिठी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता सोशल मीडियावर चाहते कोहलीचे कौतुक करत आहेत.

विशेष म्हणजे लखनऊ आणि बंगळुरू यांच्यात खेळलेला हा सामना खूप गाजला. कारण सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. कोहली यापूर्वी अमित मिश्रासोबतही भिडला होता. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोहली आणि गंभीर यांच्यातील वादाबद्दल चाहत्यांची वेगवेगळी मते आहेत. सोशल मीडियावर कोहली आणि गंभीरच्या वादावर व्यक्त आहेत. ज्यापैकी काही विराट तर काही गंभीरचे समर्थन करत आहेत.

एकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १२६ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४४ धावांची शानदार खेळी केली. याला प्रत्युत्तर देताना लखनऊचा संघ केवळ १०८ धावाच करू शकला. लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक २३ धावा केल्या. आरसीबीकडून कर्ण शर्मा आणि जोश हेझलवूडने २-२ बळी घेतले.

हेही वाचा – LSG vs RCB: लखनऊविरुद्ध विराटने दोन झेल घेत गंभीरला दिले जशास तसे उत्तर, पाहा VIDEO

या पराभवासह लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे नऊ सामन्यांतून पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. त्याचवेळी बंगळुरूचेही नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.