दिल्ली आणि हैदराबाद या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात अखेर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला संधी देण्यात आली. यंदाच्या IPLमध्ये दोन सामन्यात हैदराबादच्या संघाकडून विल्यमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्या दोन्ही सामन्यात हैदराबादचा संघ पराभूत झाला. त्यानंतर फलंदाजी बळकट करण्यासाठी अखेर विल्यमसनला संघात स्थान देण्यात आले. विल्यमसनसोबतच आणखी एका खेळाडूला हैदराबादने संघात स्थान दिले. तो खेळाडू म्हणजे अब्दुल समाद…
अब्दुल समाद हा जम्मू काश्मीरचा १८ वर्षीय तडाखेबाज फलंदाज आहे. अब्दुलला २०२०च्या IPL लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने २० लाखाच्या किमतीला विकत घेतले. IPLमध्ये जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करणारा अब्दुल हा चौथा खेळाडू आहे. या आधी परवेझ रसूल, मनझूर दर आणि रसिख सलाम हे तीन जम्मू काश्मीरचे खेळाडू IPLमध्ये खेळले आहेत.
Special moment for Abdul Samad pic.twitter.com/5wbrp6S9Zd
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 29, 2020
दरम्यान, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निवड केली. दिल्लीने आपल्या संघात महत्त्वाचा बदल करत अनुभवी इशांत शर्माला संघात स्थान दिले. तर आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवला. हैदराबादनेदेखील संघात दोन बदल करत विल्यमसनला मोहम्मद नबीच्या जागी संघात स्थान दिले. तर वृद्धिमान साहाच्या जागी अब्दुल समादला संघात जागा दिली.