Rohit Sharma on MS Dhoni:जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचा १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज असून जोरदार सराव करत आहेत. या सीझनच्या सुरुवातीपासूनच महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सीझन असू शकतो आणि त्यानंतर तो निवृत्ती घेईल अशी अटकळ सर्वत्र पसरली होती. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे धोनीबाबत वेगळे मतआहे.

धोनी अजून २-३ वर्षे खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त –

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यापैकी महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबद्दल सर्वात छान उत्तर दिले. रोहित म्हणाला, “धोनी अजून २-३ वर्षे खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. हे त्याचे शेवटचे वर्ष असेल असे मला वाटत नाही.” धोनीच्या भविष्याविषयी अटकळ बांधली जात असताना आता रोहितच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

धोनीबाबत रैना काय म्हणाला होता –

लेजेंड्स लीग दरम्यान सुरेश रैना म्हणाला होता, “तुम्हाला माहीत नाही तो पुढच्या वर्षीही आयपीएल खेळू शकतो. तो चांगली फलंदाजी करत आहे आणि तंदुरुस्त दिसत आहे. यंदाची कामगिरी कशी होते यावर ते अवलंबून असेल. तो आणि अंबाती रायुडू एका वर्षापासून स्पर्धा खेळलेले नसल्यामुळे हे थोडे आव्हानात्मक असू शकते. मला वाटते की संघ खूप मजबूत आहे, संघात बरेच युवा खेळाडू आहेत. ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, जड्डू (रवींद्र जडेजा), बेन स्टोक्स, दीपक चहर आहेत. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहूया.”

हेही वाचा – IPL 2023: आयपीएलच्या नेट्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर माहिती

आयपीएलमधील धोनीची आकडेवारी –

आयपीएलमध्ये आतापर्यंत धोनीने ३९.१९ च्या सरासरीने ४९७८धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८४ आहे. त्याने 23 अर्धशतके केली आहेत. धोनीने या कालावधीत १३५.१९च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. आता २२ धावा करताच तो आयपीएलमध्ये ५,००० धावा पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा तो केवळ सहावा खेळाडू असेल.

आयपीएल २०२२ सीएसकेची कामगिरी चांगली नव्हती –

आयपीएल २०२२ चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगले नव्हते. गुणतालिकेत संघ ९व्या क्रमांकावर होता. आयपीएल २०२३ स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) यांच्यात हा सामना होणार आहे. गुजरातने पहिल्याच सत्रात अप्रतिम कामगिरी केली होती. ते राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव करून आयपीएल २०२२ मध्ये चॅम्पियन बनले होते.