एक काळ असा होता की ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स आणि मायकेल क्लार्क यांच्यात चांगली मैत्री होती. पण काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार झाला तेव्हा अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होता. अँड्र्यू सायमंड्सला तत्कालीन कर्णधार क्लार्कने संघाच्या बैठकीतून बाहेर पडल्याने संघातून काढले होते. २०१५ मध्ये अष्टपैलू सायमंड्सने क्लार्कवर जोरदार टीका केली होती. २००८ मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यापूर्वी सायमंड्स दारूच्या नशेत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केला होता. या वादानंतर दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये मैत्री राहिली नाही.

आयपीएल २०२२च्या मध्यावर या दोघांशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सने मोठा दावा केला आहे की, आयपीएलच्या पैशामुळे त्याच्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांच्यातील नात्यात विष पसरले आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सत्रात एकत्र खेळले होते.

ब्रेट ली पॉडकास्टवर बोलत असताना अँड्र्यू सॅमंड्सने मायकेल क्लार्कसोबतच्या बिघडलेल्या नात्याबद्दल मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये मिळालेला मोठा पैसा क्लार्कच्या पचनी पडला नाही आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण होण्याचे हे एक मोठे कारण असू शकते, असे सायमंड्सचे मत आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच २००८ च्या लिलावात सायमंड्स महेंद्रसिंग धोनीनंतर दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर होता. त्याला डेक्कन चार्जर्सने ५.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मॅथ्यू हेडनने मला सांगितले की, आयपीएलमध्ये जास्त पैसे मिळत असल्याने क्लार्कच्या मनात ईर्षेची भावना निर्माण झाली होती, असे अँड्र्यू सायमंड्सने म्हटले.

सायमंड्स आणि क्लार्क यांनी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आणि वर्षानुवर्षे एकत्र खेळल्यामुळे दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. पण २००८ मध्ये त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि हळूहळू सर्व काही संपुष्टात आले. एकत्र खेळताना आमची मैत्री झाली होती, असे सायमंड्सने सांगितले. क्लार्क संघात आल्यावर मी त्याच्यासोबत फलंदाजी करायचो आणि संघात त्याची काळजीही घ्यायचो. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली.

मला मिळणाऱ्या पैसे पाहून अनेक खेळाडू खूश नव्हते – सायमंड्स

“मॅथ्यू हेडनने मला तेव्हा सांगितले की, तुला लीगमध्ये खेळण्यासाठी खूप पैसे मिळाले. त्यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याचा हेवा वाटू लागला आहे. कदाचित त्यामुळेच क्लार्क आणि माझ्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असावा.

‘पैशामुळे माझ्या आणि क्लार्कच्या मैत्रीत फूट’

 “पैसा अनेक मजेदार गोष्टी करू शकतो. ते चांगलेही असू शकत. पण कधी कधी ते विष म्हणूनही काम करते आणि मला विश्वास आहे की क्लार्कशी असलेल्या माझ्या मैत्रीत पैशाने विष म्हणून काम केले. पण तरीही मी क्लार्कचा खूप आदर करतो. त्यामुळे तेव्हा आमच्या दोघांमध्ये काय झाले आणि कोणी काय बोलले याबद्दल मला अधिक काही सांगायला आवडणार नाही. माझी आता त्याच्याशी मैत्री नाही. पण मी इथे बसून चिखल फेकणार नाही,” असे सायमंड्सने म्हटले.

सायमंड्स-क्लार्कमधील मैत्री कशी संपली?

क्लार्क आणि सायमंड दोघेही पूर्णपणे भिन्न स्वभावाचे होते. जिथे सायमंड्सला शिकार आणि मासेमारीची आवड होती. त्याच वेळी क्लार्क हा काहीतरी करु पाहत होता. त्यानंतर तो लारा बिंगल नावाच्या मॉडेलला डेट करत होता. मात्र, दोघांनाही रग्बी खेळाची आवड होती. यातूनच दोघांची मैत्री वाढली आणि पुढे ती आणखी घट्ट होत गेली. पण २००८ मध्ये मैत्री तुटली, जेव्हा सायमंड्सला डार्विनमधील कसोटी सामन्यातून थेट घरी पाठवण्यात आले कारण तो संघाच्या बैठकीऐवजी मासेमारीला गेला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क होता आणि सायमंड्सला वाटले की त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय क्लार्कचा आहे.