Ayush Mhatre Maiden IPL Fifty RCB vs CSK IPL 2025: आयुष म्हात्रेने आरसीबीविरूद्ध सामन्यात वादळी खेळी करत आयपीएल कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. या खेळीसह चेन्नई सुपर किंग्सला सामन्यात कायम ठेवलं आहे. आयुष म्हात्रेने २५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा करत आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. आरसीबीविरूद्ध सलामीला उतरलेल्या आयुषने पहिल्याच षटकात चौकार लगावला. पण एका षटकात २६ धावा करत आपला मनसुबा जाहीर केला.

वयाच्या ५व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरूवात केलेल्या आयुष म्हात्रेने तंत्रशुद्ध फलंदाजी केली. मुळचा मुंबईचा असलेला आयुष म्हात्रे रोहित शर्माला आपला आदर्श मानतो. रोहित शर्माप्रमाणेच सलामीला येत फटकेबाजी करत त्याने चेन्नईच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.

आयुष म्हात्रेने भुवनेश्वर कुमारच्या सामन्यातील चौथ्या षटकात २६ धावा केल्या. षटकाच्या सुरूवातीला त्याने चौकारांची हॅटट्रिक लगावली, यानंतरही तो थांबला नाही आणि संपूर्ण षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पहिल्या ३ चेंडूवर चौकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आणि पुढच्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत २६ धावा कुटल्या. भुवनेश्वरविरूद्धच्या षटकातील आयुष म्हात्रेची फलंदाजी पाहून सर्वच अवाक् झाले.

आयपीएल २०२५ च्या चालू हंगामातच चेन्नई सुपर किंग्सला कर्णधाराच्या रूपात मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. गायकवाडच्या जागी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले. दरम्यान सीएसकेने, १७ वर्षीय स्फोटक सलामीवीर फलंदाजाला चेन्नई सुपर किंग्स संघात ऋतुराज गायकवाडच्या जागी सामील केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या १७ वर्षीय खेळाडूला संघात सामील केलं आहे. त्याने ऋतुराज स्पर्धेबाहेर झाल्यानंतर ट्रायल दिले होते, त्यानंतर त्याची संघात निवड करण्यात आली आहे. चेन्नईच्या लखनौविरूद्ध सामन्यानंतर संघाने आयुष म्हात्रेला संघात सामील केल्याची घोषणा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष म्हात्रेने आतापर्यंत त्याने नऊ प्रथम श्रेणी आणि सात लिस्ट ए सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. आयुषने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या १६ डावांमध्ये ३१.५० च्या सरासरीने ५०४ धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटच्या सात डावांमध्ये ६५.४२ च्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत. आयुष केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही माहिर आहे.