PBKS vs MI, Yuzvendra Chahal Injury Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. मात्र टॉप २ मध्ये कोणते संघ खेळणार हे आजूनही स्पष्ट झालेलं नाही. मुंबई इंडियन्सचा इंडियन्सचा संघ आज साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईचा सामना पंजाब किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून मुंबईकडे टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. तर पंजाबकडे देखील नामी संधी असणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
पंजाब किंग्जकडे टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची नामी संधी होती. त्यासाठी पंजाबला २ पैकी एका सामन्यात मोठ्या विजयाची संधी होती. मात्र, पंजाबला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना गमावल्यामुळे पंजाब किंग्जचं टेन्शन वाढलं आहे. कारण हा सामना पंजाब आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मुंबईकडेही अव्वल स्थानी जाण्याची संधी आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पूर्ण जोर लावताना दिसून येईल.
युजवेंद्र चहल आज खेळणार का?
दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात युजवेंद्र चहल खेळू शकला नव्हता. पंजाबचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. ईएसक्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, चहलच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
युजवेंद्र चहल हा पंजाब किंग्ज संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत असणाऱ्या चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर अनेक अशक्य विजय खेचून आणले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यातही चहलने हॅट्रिक घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध होणारा सामना देखील पंजाब किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे चहलसारखा गोलंदाज संघात नसणं ही पंजाबसाठी चिंताजनक बाब आहे.