Punjab kings vs Delhi Capitals Score Updates : आयपीएल २०२३ चा ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दिल्लीचे सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अप्रतिम फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. वॉर्नर आणि पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर रायली रोसोचं वादळ आलं आणि धावांचा वेग वाढला. रोसोने ३७ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीनं ८७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात २ विकेट्स गमावत २१३ धावांपर्यंत मजल मारली. पंजाब किंग्जला विजयासाठी २१४ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
पहिल्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी ९० हून अधिक धावांची भागिदारी केली. परंतु, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना वॉर्नर सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरने ३१ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तसंच पृथ्वी शॉनेही धडाकेबाज फलंदाजी करत ३८ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रायली रोसोने पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ३७ चेंडूत ८७ धावा कुटल्या. तर फिल सॉल्टने १४ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी साकारली.
पंजाब किंग्जसाठी सॅम करनने भेदक मारा करून वॉर्नर आणि पृथ्वी शॉला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. पंरतु, रोसोने चौफेर फटकेबाजी करण्याचा धडाका सुरुच ठेवला. त्यामुळे दिल्लीच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. रायली रोसोनेही अर्धशतकी खेळी करत दिल्लीची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढवली.