GT vs MI Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघ या स्पर्धेतील बलाढ्य संघांपैकी एक. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होण्याची अपेक्षा होती. झालंही तसंच, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकाअंखेर २२८ धावांचा डोंगर उभारला. महत्वाच्या सामन्यात इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणं मुळीच सोपं नव्हतं. मात्र, गुजरातच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला आणि गोलंदाजांनीही धावांचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शेवटी मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि हा सामना २० धावांनी जिंकत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. या संघाचा सामना १जूनला पंजाब किंग्जविरूद्ध होणार आहे.

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावा करायच्या होत्या. एलिमिनेटरच्या हाय प्रेशर सामन्यात इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं मुळीच सोपं नव्हतं. गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण, ट्रेन्ट बोल्टने शुबमन गिलला पायचित करत स्वस्तात माघारी धाडलं. शुबमन गिल १ धाव करत माघारी परतला. त्यानंतर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या कुसल मेंडिसने १० चेंडूत २० धावांची खेळी केली. कुसल मेंडिसही चांगला सेट झाला होता. मात्र, मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर त्याने स्टम्पला बॅट मारून पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने जवळपास १०० धावा जोडल्या. या जोडीने मुंबईची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती. जो गोलंदाज गोलंदाजीला येत होता,त्या गोलंदाजाची धुलाई होत होती. शेवटी हार्दिकने आपला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला बोलवले. या षटकात बुमराहने भन्नाट यॉर्कर टाकून वॉशिंग्टन सुंदरची दांडी गुल केली. सुंदर ४८ धावांवर माघारी परतला.

मुंबई इंडियन्सने उभारला २२८ धावांचा डोंगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येची गरज होती. रायन रिकल्टनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात करण्यासाठी जॉनी बेअरस्टो आला. या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ४७ धावांची खेळी केली. रोहित आणि जॉनी बेअरस्टोने मिळून पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर, सूर्यकुमार यादवने २० चेंडूंचा सामना करत ३३ धावांची खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने २५ धावा चोपल्या. तिलकने आपल्या खेळीदरम्यान ३ षटकार खेचले. हार्दिक पांड्याने देखील ३ षटकार खेचत नाबाद २२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर २२८ धावांचा डोंगर उभारला.