Gurnoor Brar chance to replace Sushant Mishra : आयपीएल २०२४ मध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आता आयपीएल २०२४ चा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. चालू हंगामात गुजरात टायटन्सचे अजून दोन सामने बाकी आहेत. मात्र याआधी गुजरात टायटन्स संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एका २३ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाजाने संघात प्रवेश केला आहे.

सुशांत मिश्राच्या जागी मिळाली संधी –

दुखापतग्रस्त डावखुरा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राच्या जागी गुजरात टायटन्सने उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा संघात समावेश केला आहे. गुरनूर देशांतर्गत स्पर्धांमध्ये पंजाबकडून खेळतो. आयपीएलमधील त्याचा हा दुसरा हंगाम असेल. तो याआधी पंजाब किंग्जकडून खेळला आहे. या २३ वर्षीय खेळाडूला एका आयपीएल सामन्याचा अनुभव आहे. गुजरातने आयपीएल २०२४ साठी गुरनूर ब्रारला ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

गेल्या मोसमात तो लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध पंजाब किंग्जकडून सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने एकही विकेट न घेता ३ षटकात ४२ धावा दिल्या. गुरनूरने २०२१ मध्ये पंजाबसाठी एक लिस्ट ए सामनाही खेळला आहे. गोव्याविरुद्धच्या या सामन्यात त्याने ६२ धावांत एक विकेट घेतली होती. प्रथम श्रेणीमध्ये त्याने ८ सामन्यांत ४५.५७ च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – BCCI चा मोठा निर्णय! आता सामन्यापूर्वी नसणार नाणेफेकीची गरज, प्रथम फलंदाजी की गोलंदाजी करणार? जाणून घ्या

गुणतालिकेत गुजरात टायटन्स आठव्या स्थानी –

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत आव्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातने आतापर्यंत १२ सामन्यांपैका ५ जिंकले असून ७ गमावले आहेत. त्यामुळे संघाचे १० गुण आहेत. गुजरात अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मात्र, गुजरात उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तसेच, इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. गुजरातचे पुढील दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी होणार आहेत.

हेही वाचा – सकाळी आठ वाजल्यापासून रोहितची वाट पाहत होती चाहती, मग हिटमॅनच्या ‘या’ कृतीने जिंकलं मन, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात टायटन्सचा संघ –

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, अभिनव मनोहर, संदीप वॉरियर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, ऋद्धिमान साहा, जोशुआ लिटल, विजय शंकर, मानव सुथार, केन विल्यमसन, साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, गुरनूर ब्रार.