Hardik Pandya 7 Stiches: हार्दिक पांड्या खरा जिगरबाज आहे. हे त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दाखवून दिलं आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या डाव्या डोळ्याच्या वर ७ टाके असतानाही फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. फलंदाजीत त्याने धमाका केला. त्यानंतर गोलंदाजीतही त्याची जादू पाहायला मिळाली.
हार्दिक पांड्याला सामन्यापूर्वी सराव करत असताना दुखापत झाली होती. माध्यमातील वृत्तानुसार, त्याच्या डोळ्याच्या वर ७ टाके पडले. असं असतानाही त्याची कामगिरी खालावली नाही. हार्दिकने या सामन्यात फलंदाजी करताना २३ चेंडूंंचा सामना करत नाबाद ४८ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने १ गडी देखील बाद केला. त्यामुळेच हार्दिक पांड्या संध्याकाळच्या सामन्यात सन ग्लासेस घालून मैदानात उतरला होता.
एखाद्या खेळाडूने टाके असतानाही मैदानात उतरुन विरोधी संघातील खेळाडूंना घाम फोडल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील हाताला ८ टाके असताना फलंदाजीसाठी उतरला होता. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
आता हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना अष्टपैलू खेळी करून विराट कोहलीची आठवण करून दिली आहे. हार्दिकने नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर त्याची सुपर स्ट्राईकर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. त्याने शेवटी फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २१७ धावांचा डोंगर उभारला होता. मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनीही अर्धशतकं झळकावली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हार्दिक आणि सूर्या दोघेही ४८-४८ धावांवर नाबाद माघारी परतले.
या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालची जोडी या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. राजस्थानचा संपूर्ण डाव राजस्थान रॉयल्स संघाचा डाव ११७ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला.