IPL 2025 PBKS vs MI Match Updates: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स वि.पंजाब किंग्स यांच्यात प्लेऑफसाठी टॉप-२ च्या दृष्टीने महत्त्वाचा सामना असणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्सच्या संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईचा संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यापूर्वी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रथम फलंदाजी कि गोलंदाजी हा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढला. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना दोन्ही संघांसाठी शेवटचा साखळी सामना आहे.
दोन्ही संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले असले तरी, शेवटचा साखळी सामना दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजयामुळे विजेत्या संघाला टॉप-टूमध्ये स्थान मिळेल. पंजाब किंग्ज सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे ठरवणं हे मोठं काम असत. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी ही कोंडी सोडवण्यासाठी एक खेळ खेळावा लागला. नाणेफेकीच्या अगदी आधी, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांशी चर्चा करताना दिसला, सूर्यकुमार त्याच्या शेजारी उभा होता.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाणेफेकीसाठी जात असताना सूर्यकुमारने त्याला थांबवले. त्यानंतर भारताच्या टी-२० कर्णधाराने दोन बोटे पुढे करून हार्दिकला एक निवडण्यास सांगितले. हार्दिकने त्याची निवड करताच, सूर्यकुमारने त्याला ‘प्रथम फलंदाजी’ असे सांगितले.
प्रत्यक्षात हार्दिक पंड्याने नाणेफेक गमावली असली तरी, मुंबई इंडियन्स या विजयासाठी आवश्यक असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी बोलताना हार्दिकने असेही उघड केले की मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन नाणेफेकीनंतर प्रथम काय निवडावं, याबद्दल अनिश्चित होते. त्यामुळे नाणेफेक गमावणं चांगलं ठरलं.
मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ५२ धावा केल्या होत्या. भारताने मधल्या षटकांमध्ये ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पण सूर्यकुमार यादव आपल्या शानदार फॉर्मसह मैदानावर कायम आहे.