IPL 2025 Who Recommend Vaibhav Suryavanshi Name to Rahul Dravid: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या शतकी कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात जेव्हा राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १.१० कोटी रूपयांना संघात सामील केलं, तेव्हा सर्वांच्या परिचयाचा झाला. यानंतर आता गुजरात टायटन्स संघाविरूद्ध ३५ चेंडूत शतक झळकावत विक्रमी कामगिरी केली आहे. पण वैभव सूर्यवंशीच्या आयपीएलमधील निवडीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं मोठं योगदान आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मधील राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये येण्याआधी भारताकडून अंडर-१९ क्रिकेट खेळला आहे. ज्यामध्ये त्याने त्रिशतक झळकावले आहे.

वैभव सूर्यवंशी हा फक्त १४ वर्षांचा असून त्याने या वयात रणजी करंडक, हेमंत करंडक, कूचबिहार करंडक आणि विनू मांकड ट्रॉफी खेळली आहे. अलीकडेच त्याची भारतीय अंडर-१९ संघातही निवड झाली होती. वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली.

वैभव सूर्यवंशीची IPL मध्ये कशी निवड झाली?

BCCI अंडर-19 वनडे चॅलेंजर स्पर्धेदरम्यान वैभव सूर्यवंशीची व्हीव्हीएस लक्ष्मणशी भेट झाली होती. बिहारमधील जिल्हा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर वैभवला या मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धदरम्यान त्याची खेळी आणि त्याच्यातील प्रतिभा पाहून लक्ष्मणने त्याला इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या अंडर-१९ मालिकेसाठी निवडले. पण इंडिया बी साठी खेळलेल्या एका सामन्यात, वैभव ३६ धावांवर धावबाद झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन रडू लागला.

वैभवचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, एका सामन्यात वैभव ३६ धावांवर बाद झाला होता. यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये जाऊन रडू लागला. लक्ष्मणने त्याला रडताना पाहिलं तेव्हा ते वैभवकडे गेले आणि म्हणाले, “आम्ही फक्त धावाचं पाहत नाही, आम्हाला असे खेळाडू हवे आहेत जे दीर्घकाळ चांगली कामगिरी करू शकतील.” व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वैभवमधील क्षमता खूप लवकर ओळखली आणि बीसीसीआयनेही त्याला पाठिंबा दिला आहे.

माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दोन वर्षे वैभवच्या प्रगतीवर जातीनं लक्ष ठेवल आणि नंतर राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे त्याची शिफारस केली. त्यांच्या शिफारशीमुळेच वैभवला आयपीएलमध्ये संघात स्थान मिळाले. व्हीव्हीएस लक्ष्मण हे बीसीसीआयच्या एनसीए नॅशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य आहेत.

लक्ष्मण यांच्या शिफारसीनंतर राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स संघाने त्याची आयपीएलमध्ये निवड केली. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर, वैभवने १९ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आपली प्रतिभा सिद्ध केली. आता गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावत त्याने संपूर्ण जगाला आपल्या कामगिरीची भुरळ घातली.