संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा धावून आला आहे. अबु धाबीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात मुंबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे संघ संकटात सापडला होता. क्विंटन डी-कॉक, रोहित शर्मा हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत मुंबईचं आव्हान सामन्यात कायम राखलं. कृणाल पांड्या आणि त्यानंतर हार्दिक पांड्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत सूर्यकुमारने मुंबईला १९३ धावांचा टप्पा गाठून दिला.

सूर्यकुमार यादवने राजस्थानच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत ४७ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणनेही सूर्यकुमारच्या खेळीचं कौतुक करत, सध्या सूर्यकुमार ज्या फॉर्मात आहे ते पाहता त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही तर ते खरंच खूप निराशाजनक असेल असं मत व्यक्त केलं आहे.

राजस्थानकडून श्रेयस गोपाळने एकाच षटकात दोन बळी घेत मुंबईला धक्का दिला. याव्यतिरीक्त जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.