आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली. या लढतीत लखनऊचा ३६ धावांनी विजय झाला. तर मुंबईला सलग आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्स या सामन्यात तरी आपला पहिला विजय नोंदवेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघ नेमका कुठे चुकतोय याबाबत कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे.

हेही वाचा >>> MI vs LSG : “…तर आम्हाला बदल करावे लागतील”; फलंदाजीतील वारंवार अपयशानंतर प्रशिक्षक महेला जयवर्धने व्यक्त केली चिंता

लखनऊसोबतच्या सामन्याबाबत बोलताना “मला वाटतं की आम्ही गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. वानखेडेचे मैदान फलंदाजी करण्यासाठी चांगले आहे. त्यामुळे गोलंदाजांना रोखणे सोपे नव्हते. मात्र यामध्ये आमचे गोलंदाज यशस्वी ठरले. आम्ही फलंदाजी विभागात कमी पडलो. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. धावसंख्येचा पाठलाग करताना दोन फलंदाजांमध्ये भागिदारी होणे गरजेचे असते. मात्र आमच्या संघात तसे झाले नाही. आमच्या फलंदाजांनी काही चुकीचे फटके मारले,” असे रोहित शर्माने सांगितले.

हेही वाचा >>> LSG vs MI : मुंबईवर विजय मिळवूनही लखनऊचा संघ अडचणीत; कर्णधार राहुलला २४ लाखांचा दंड, बंदी घालण्याचीही शक्यता

तसेच मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचेही रोहित शर्मा म्हणाला. “आम्ही या हंगामात फंलदाजी चांगली केलेली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यांना मोठी खेळी करावी लागणार आहे. दुसऱ्या टीमच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी मोठी खेळी केलेली आहे. आमच्या संघातील एखाद्या खेळाडूला मैदानावर जास्त काळासाठी टिकून राहत फलंदाजी करणे गरजेचे आहे. एखाद्या खेळाडूने ही जबाबदारी घेतली पाहीजे,” असेदेखील रोहित शर्मा म्हणाला.

हेही वाचा >>> MI vs LSG : पोलार्डला बाद केल्यानंतर कृणालने त्याच्या डोक्यावर केले किस; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईची प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची आशा मावळली आहे. आता उर्वरित सामन्यांमध्ये प्रतिष्ठा जपण्यासाठी मुंबईला चांगला खेळ करावा लागणार आहे.