आयपीएल २०२२ मध्ये, पॉइंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. सलग सहा पराभव सहन केल्यानंतर, मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण धोनीने ते होऊ दिले नाही. शेवटच्या चार चेंडूत १६ धावांची गरज होती आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्रसिंग धोनी स्ट्राइकवर होता. त्यानंतर धोनीने दमदार खेळीने चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर रवींद्र जडेजाने जे केले, त्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. त्यामुळेच जडेजाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 गुरुवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा ३ गडी राखून पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावली. धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. धोनी १३ चेंडूत २८ धावा करून नाबाद राहिला. सामना जिंकून धोनी परतत असताना चेन्नई संघाचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा त्याच्यापुढे नतमस्तक झाला. सामना संपवून धोनी मैदानातून परतत असताना कर्णधार जडेजा आला आणि त्याने वाकून नमस्कार केला, तर अंबाती रायडूने हात जोडले. धोनीने चेन्नईला मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवून दिला. धोनीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहता जुने दिवस परत आल्यासारखे वाटत होते.

जडेजाने सामन्यानंतर सांगितले की, “आम्ही थोडे घाबरलो होतो पण आम्हाला माहित होते की धोनी क्रीजवर आहे आणि तो आमच्यासाठी सामना संपल्यानंतरच परत येईल. अशा स्थितीत आम्हालाही जिंकण्याची संधी आहे, याची जाणीव होती. मुकेश चौधरीनेही उत्तम गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये त्याने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली.”

सामन्याच्या शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी १७ धावा करायच्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पहिल्याच चेंडूवर प्रिटोरियसला बाद करून मुंबईचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होने एक धाव घेतली. आता चेन्नईला चार चेंडूत १६ धावा करायच्या होत्या. धोनीने लाँग ऑफवर तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. आयपीएलच्या इतिहासातील २०व्या षटकातील त्याचा हा ५१वा षटकार होता. चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर त्याने शॉर्ट फाईन लेगवर चौकार मारून विजय मिळवून दिला.

चेन्नई सुपर किंग्सनेने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आवाहन केले. मुंबई इंडियन्सने २० षटकांत सात बाद १५५ धावा केल्या. तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची खेळी खेळली, तर मुकेश चौधरीने तीन षटकांत १९ धावांत तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने २० षटकांत सात बाद १५६ धावा करून सामना जिंकला. धोनी १३ चेंडूत २८ धावा करून नाबाद परतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 csk vs mi captain jadeja bowed down to ms dhoni performance abn
First published on: 22-04-2022 at 11:01 IST