IPL 2022 , GT vs LSG :आयपीएलच्या पंधाराव्या हंगामात आज चौथा सामना खेळवला जातोय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेला हा सामना चांगलाच चुरशीचा ठरणार आहे. कारण या सामन्याच्या पहिल्याच चेंडूमध्ये लखनऊला मोठा धक्का बसलाय. लखनऊकडून फलंदाजीला उतरलेला केएल राहुल पहिल्याच चेंडूमध्ये झेलबाद झालाय. आजच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. हे दोन्ही संघ आयपीएल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच नव्याने उतरले आहेत. दरम्यान नव्याने आलेले दोन्ही संघ पहिल्यांदाच मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच चेंडूमध्ये केएल राहुल बाद झालाय. सामन्याचा पहिला चेंडू मोहम्मद शमीने टाकला. मात्र या चेंडूचा सामना करताना लखनऊचा कर्णधार केएल राहुल गोंधळला. यातच चेंडू बॅटला स्पर्श करत यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावल्यानंतर शमीने अपील केली. मात्र पंचाने नकार दिला. त्यानंतर गुजरातने पहिल्याच चेंडूवर डिआरएस घेतला. त्यानंतर बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागल्याचे स्पष्ट झाले आणि राहुल पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाला. दरम्यान, आयपीएलच्या १५ व्या हंगामात केएल राहुल सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्याला 17 कोटी रुपयांना लखनऊने खरेदी केलेले आहे. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये सलामीसाठी उतरलेल्या राहुलने निराशा केली. तो पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाला. त्यानंतर आता लखनऊच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे अशा प्रकारे बाद होणे नवे नसून खुद्द माझ्यासोबत असे तीन वेळा झाले आहे. पहिल्या चेंडूमध्ये मी तीन वेळा बाद झालेलो आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी म्हटलंय.