मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना गुरुवारी शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला गेला आणि एमएस धोनीने आपला खेळ दाखवत चेन्नईला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. या मोसमात मुंबई इंडियन्सचा हा सलग सातवा पराभव होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम खूपच वाईट ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल का? आणि या विजयाचा चेन्नई सुपर किंग्जला किती फायदा झाला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले सात सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने पहिले सात सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएलमधील कोणत्याही संघाचा इतका वाईट रेकॉर्ड नाही. आश्‍चर्याची बाब म्हणजे यामध्ये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघही मुंबई आहे. याआधीही हा खराब विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता, जेव्हा संघाने २०१४ च्या आयपीएलमध्ये पहिले पाच सामने गमावले होते. पण त्या मोसमात मुंबईने प्लेऑफमध्ये धडक मारली होती.

आणखी एका वाईट विक्रमाच्या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव सामील झाले आहे. मुंबई आता सलग सात हून अधिक सामने हरणारा आयपीएल संघ बनला आहे. मुंबई व्यतिरिक्त डेक्कन चार्जर्सने आयपीएल २००८ आणि पंजाब किंग्ज २०१५ मध्ये सलग सात सामने गमावले होते. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचेही नाव आहे. दिल्लीने २०१४ मध्ये सलग नऊ सामने गमावले होते. या मोसमात मुंबईने आपले पुढील दोन सामने गमावले तर हा विक्रमही मोडीत निघेल.

आयपीएल २०२२ मध्ये सर्व संघांना एकूण १४-१४ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे जर गणित मांडले तर मुंबई इंडियन्सचे आता सात सामने शिल्लक आहेत आणि ते सर्व जिंकले तर त्यांचे गुण १४ होतील आणि सध्याचा फॉर्म पाहता इतके गुण मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य वाटते. गुणतालिकेमध्ये दोन संघांच्या खात्यात १० गुण आहेत, तर तीन संघांनी आठ गुण मिळवले आहेत.

अशा स्थितीत पाचवेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफच्या आधी बाहेर पडू शकतो. त्याच वेळी, चेन्नईचा संघ सामना जिंकला असेल, परंतु उर्वरित सात सामने त्यांच्यासाठीही करा किंवा मरा अशाच परिस्थितीचे असतील.

सात सामन्यांतून दोन विजयांसह सीएसकेच्या खात्यात चार गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट देखील नकारात्मक आहे. अशा स्थितीत संघाला उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्सने २० षटकांत सात बाद १५५ धावा केल्या आणि सीएसकेने २० षटकांत तेवढ्याच विकेट्स गमावून १५६ धावा करून सामना जिंकला.

तरीही मुंबईजवळ काही पर्याय आहे का?

सलग सातवा सामना गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे. पण तरी मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र यासाठी मुंबईला उर्वरित सर्व सामने जिंकून आणि उर्वरित संघ हरण्याची वाट पाहावी लागणार आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता हेही अशक्य वाटते.

पाच वेळा मुंबई ठरली चॅम्पियन

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव अग्रक्रमाने येते. मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटले जाते. या संघाने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावले आहे. संघ व्यवस्थापनाचा खेळाडूंवर असलेला विश्वास हे या संघाच्या यशाचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.