नवी मुंबई : नामांकित खेळाडूंचा समावेश असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी उत्सुक असून बुधवारी त्यांच्यापुढे कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळूरु आणि कोलकाता या दोन्ही संघांची यंदाच्या हंगामाची भिन्न सुरुवात झाली. कोलकाताने सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर मात केली, तर बंगळूरुला पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. बंगळूरुने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०० हून अधिक धावा फलकावर लावल्या. मात्र, त्यांचे गोलंदाज पंजाबला रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा कामगिरीत सुधारणेचा प्रयत्न असेल. 

दुसरीकडे, कोलकाताच्या संघाचा कामगिरीत सातत्य राखण्याचा मानस असेल. पहिल्यांदाच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताच्या संघाने चेन्नईविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत चांगला खेळ केला. त्यामुळे बंगळूरुविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांच्या संघात बदल होणे अपेक्षित नाही. नवी मुंबईतील डी. वाय. स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांना दवाचा सामनाही करावा लागेल. ही गोष्ट फलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता आहे.

 ’ कोहलीची मोठी खेळी?

कर्णधारपदाच्या दडपणाविना खेळणाऱ्या विराट कोहलीने पंजाबविरुद्ध सलामीच्या लढतीत २९ चेंडूंत नाबाद ४१ धावा केल्या. मात्र, त्याचा अधिक आक्रमक शैलीत फलंदाजी करून मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. कर्णधार फॅफ डूप्लेसिसने (५७ चेंडूंत ८८) पहिल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याला सलामीचा साथीदार अनुज रावतची साथ मिळणे गरजेचे आहे. अनुभवी दिनेश कार्तिक पुन्हा विजयवीराची भूमिका पार पाडेल. गोलंदाजीत मागील वर्षी ‘पर्पल कॅप’ पटकावणारा हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी सलामीच्या लढतीत निराशाजनक कामगिरी केली. तसेच श्रीलंकन फिरकीपटू वानिंदू हसरंगाही चांगली गोलंदाजी करू शकला नाही. बंगळूरुला विजय मिळवण्यासाठी त्यांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.

रहाणे, श्रेयसवर भिस्त

कोलकाताच्या फलंदाजीची अनुभवी सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस या मुंबईकरांवर भिस्त आहे. रहाणेने चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या लढतीत ४४ धावांची खेळी करत कोलकाताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याच सामन्यात श्रेयसला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. मधल्या फळीत त्याच्यासह नितीश राणा, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन यांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्यांच्या संघात फटकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलचाही समावेश असून त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल. गोलंदाजीत उमेश यादवला फिरकी जोडी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीनची साथ लाभेल.

वेळ : रात्री ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 royal challengers bangalore vs kolkata knight riders match prediction zws
First published on: 30-03-2022 at 04:19 IST