scorecardresearch

GT vs LSG : शुभमन गिलने दमदार फलंदाजीने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

लखनऊविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने शानदार खेळी खेळली आणि ६८ धावा करून नाबाद राहिला.

Shubhaman Gill equaled Sachin Tendulkar record with strong batting
(फोटो सौजन्य – IPL)

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या आयपीएल २०२२ च्या ५७व्या सामन्यात गुजरात संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या खात्यात आता १८ गुण आहेत. गुजरात टायटन्सच्या या सामन्यात शुभमन गिलने शानदार खेळी खेळली आणि ६८ धावा करून नाबाद राहिला. शुभमन गिल या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

शुभमन गिलने मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ४९ चेंडूत ६३ धावा केल्या. या डावात त्याने ७ चौकार मारले आणि संपूर्ण २० षटके क्रीजवर टिकून राहिला. आयपीएलच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूने संपूर्ण २० षटके फलंदाजी केली आणि एकही षटकार मारला नाही. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली आहे.

सचिन तेंडुलकरने २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता शुभमन गिलने २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

शुभमन गिलच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर या मोसमात आतापर्यंत त्याने १२ सामन्यात २८४ धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे, तर त्याची सरासरी ३५ च्या आसपास आहे. गिलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४० चौकार,९ षटकार मारले आहेत.

शुभमन गिलने सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले की, क्रिकेटमध्ये कोणता दिग्गज त्याच्यासाठी मोठा प्रेरणास्थान आहे. २२ वर्षीय शुभमन गिल म्हणाला की तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याची प्रेरणा मानत होता पण आता निवृत्तीनंतर तो विराट कोहलीचा चाहता आहे.

भारतासाठी १३ सामने खेळलेला शुभमन गिल म्हणाला, “मी मोठा होत असताना सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे सचिन सर होते. ते निवृत्त झाल्यापासून आणि मला हा खेळ थोडा अधिक समजू लागल्यापासून मी विराटचा चाहता आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 shubhaman gill equaled sachin tendulkar record with strong batting abn