भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याला आयपीएलमुळे ओळख मिळाली आहे. आयपीएलच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव हा गेल्या काही काळापासून लीगमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ठरला आहे. सूर्यकुमारचे टोपणनाव स्काय (SKY) आहे. त्याचे सहकारी आणि चाहते त्याला याच नावाने बोलवतात. पण सूर्यकुमार यादवला हे नाव कसे आणि कोणी दिले याचा खुलासा आता त्याने केला आहे.

सूर्यकुमारने २०१२ मध्ये मुंबईकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मात्र, २०१४ मध्ये केकेआरकडून खेळताना त्याने आपल्या फलंदाजाने सर्वांना चकित केले होते. त्यावेळी कोलकाताचा कर्णधार हा गौतम गंभीर होता. त्याने या सूर्यकुमारवर विश्वास दाखवला आणि भरपूर संधी दिल्या. दरम्यान, सूर्यकुमार यादवचे स्काय हे टोपणनाव २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात असताना ठेवले होते आणि ते कर्णधार गौतम गंभीरनेच दिले होते.

ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये स्वतः सूर्यकुमार यादवने याचा खुलासा केला आहे. “२०१४ मध्ये जेव्हा मी केकेआरच्या संघात गेलो होतो तेव्हा गौती भाईंनी मला मागून दोन-तीन वेळा ‘SKY’ अशी हाक मारली होती. मी लक्ष दिले नाही. मग तो म्हणाला, मी तुलाच बोलावतोय. तुझे इनिशियल्स बघ!’ मग मला कळलं की हो ते ‘स्काय’ आहे,” असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

सचिन तेंडुलकरबाबतही सूर्यकुमारने दिली प्रतिक्रिया

सूर्यकुमार यादव हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि त्यामुळेच साहजिकच त्याच्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा खोलवर प्रभाव आहे. यादवने तेंडुलकरसोबत एक किस्सा शेअर केला आणि सांगितले की सचिनने त्याला मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये आपल्या शेजारी बसवले होते आणि तेव्हापासून मी तिथेच बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो तेव्हा बसायला जागा नव्हती. मी माझी किट बॅग घेऊन उभा राहिलो. तेंडुलकर गणपतीच्या मूर्तीजवळ बसायचे. त्याने मला त्याच्या शेजारी बसायला सांगितले आणि तेव्हापासून मी तिथेच बसतो. जर देवाने तुम्हाला त्याच्या शेजारी बसण्यास सांगितले असेल तर नेहमी तसेच करायला हवे,” असे सूर्यकुमार म्हणाला.