मोहाली : गेल्या सामन्यातील विजयानंतर कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक मुंबई इंडियन्स संघापुढे बुधवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचे आव्हान असेल. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांचा कस लागणे अपेक्षित आहे.

पाच वेळा ‘आयपीएल’ विजेत्या मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. मुंबईने यंदाच्या हंगामातील पहिले दोन सामने गमावले, मग सलग तीन सामने जिंकले होते. मात्र, पुढील दोन सामन्यांत मुंबईला पुन्हा पराभव पत्करावा लागला. तर गेल्या सामन्यात मुंबईने विजयी पुनरागमन करताना राजस्थान रॉयल्सवर मात केली. त्यामुळे आठ सामन्यांत चार विजयांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत वरच्या स्थानाकडे कूच करण्यासाठी मुंबईला या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने नऊपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पंजाबनेही गेल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईप्रमाणेच पंजाबचेही सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल.

मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावरील गेल्या सामन्यात लखनऊने तब्बल २५७ धावांची मजल मारली होती. त्यामुळे पंजाब-मुंबई सामन्यातही मोठी धावसंख्या अपेक्षित आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

फलंदाजांकडून अधिक योगदान गरजेचे

शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांचा अपवाद वगळता पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा, लियाम लििव्हगस्टोन आणि सॅम करन फटकेबाजी करण्यात सक्षम आहे. गेल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध २०१ धावांचा यशस्वी पाठलाग करताना या पाच फलंदाजांनी आक्रमक खेळी केल्या होत्या. मात्र, लििव्हगस्टोन आणि जितेशसारख्या फलंदाजांकडून पंजाबला अधिक योगदानाची अपेक्षा आहे. सॅम करन, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग असे दर्जेदार वेगवान गोलंदाज पंजाबकडे आहेत. मात्र, त्यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण टाकण्यात अपयश येत आहे. पंजाबसाठी हा चिंतेचा विषय आहे.

ग्रीन, डेव्हिड, सूर्यकुमारवर भिस्त

मुंबईने गेल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध २१३ धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. मुंबईकडून सूर्यकुमार यादव (२९ चेंडूंत ५५), कॅमरून ग्रीन (२६ चेंडूंत ४४) आणि टीम डेव्हिड (१४ चेंडूंत नाबाद ४५) यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त या तिघांवरच अवलंबून असेल. ग्रीनने गेल्या चार सामन्यांत अनुक्रमे नाबाद ६४, ६७, ३३, ४४ अशा धावा केल्या आहेत. तो ही लय कायम राखेल अशी मुंबईला आशा असेल. इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात मिळवून देणे गरजेचे आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि पियूष चावला यांच्यावर मुंबईची मदार असेल.