IPL 2024, RR vs LSG Match Updates : आयपीएलच्या १७व्या हंगामातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये राजस्थानच्या रॉयल्सने २० धावांनी साामना जिंकत विजयाने हंगामाची सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने कर्णधार संजू सॅमसनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावरवर ४ बाद १९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपरजायंट्सला कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरणच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ६ बाद १७६ धावांच करता आल्या.

लखनऊनकडून सलामीसाठी डि कॉक (४) आणि केएल राहुल (५८) उतरले होते. डिकॉक लवकर बाद झाला तर देवदत्त पड्डिकल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. आयुष बडोनीसुध्दा १ धाव घेत बाद झाला. तर दिपक हुडाने २६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पुरन ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची शानदार खेळी केली. तर स्टॉसनिसही ३ धावा करत स्वस्तात बाद झाला. पुरन आणि केएल राहुल वगळता कोणीही मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. लखनऊचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीसमोर मैदानात फार काळ टिकू शकले नाहीत.

राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने ३५ धावा देत २ विकेट घेतले. बर्गर आणि अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली. तर चहल आणि संदीप शर्माला १-१ विकेट घेण्यात यश आले.

तत्त्पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी आणि बटलरने संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण बटलर ११ धावा करत लवकर बाद झाला तर यशस्वी ही २४ धावा करत बाद झाला, पण बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या विस्फोटक शैलीत १ षटकार आणि ३ चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन (८२) आणि रियान पराग (४३) यांनी १०० अधिक धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने विस्फोटक ८२ धावांची खेळी केली. तर रियानने २९ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. हेटमायर ५ धावा करत बाद झाला तर ध्रुव जुरेलने एक चौकार आणि षटकाराच्या मदतीने नाबाद २० धावा करत संघाची धावसंख्या १९३ वर नेली.

लखनऊकडून मोहसिन खानने ४ षटकांत सर्वाधिक ४५ धावा देत १ विकेट घेतली तर नवीन उल हकने २ विकेट घेत ४१ धावा दिल्या. या दोघांनीही राजस्थानच्या सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली.