IPL 2024, Delhi Capitals vs Chennai Super Kings: महेंद्रसिंग धोनी आणि फिनिशरची भूमिका हे समीकरणचं वेगळं आहे. अखेरच्या षटकांमध्ये धोनी मैदानात असणार म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार हे निश्चित असतं. धोनीचं हेच रूप दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला असला तरी चाहत्यांना धोनीची फलंदाजी पाहण्याचा आनंद पुन्हा एकदा लुटता आला. ४२ वर्षीय धोनीने अखेरच्या षटकात २ चौकार आणि २ षटकारांसह २० धावा करत धोनी अजूनही आपल्या फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर धोनीची तुफानी फलंदाजी पाहिल्यानंतर त्याची पत्नी साक्षी धोनीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

धोनीच्या पत्नीने त्याच्या या शानदार खेळीबद्दल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमधील फोटोमध्ये धोनी इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच अवॉर्ड घेताना दिसत आहे. साक्षीने या फोटोवर कॅप्शनमध्ये म्हटले; “सर्वात आधी ऋषभ पंत पुन्हा मैदानावर परतल्याबद्दल तुझं स्वागत. हॅलो माही, आपण सामना हरलो असं वाटलंच नाही.”

१७व्या षटकात शिवम दुबे बाद झाल्यानंतर एमएस धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. यापूर्वी झालेल्या चेन्नईच्या दोन्ही सामन्यात धोनीला फलंदाजी करण्यासाठी येण्याची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे त्याला फलंदाजी करताना पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धोनी मैदानात उतारताच चाहते जल्लोष करताना दिसले आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोनीने येताच पहिल्या चेंडूवर खलील अहमदविरुद्ध चौकार मारून आपले खाते उघडले. यानंतर धोनी थांबला नाही आणि त्याने १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद ३७ धावा केल्या. धोनीने २०व्या षटकात एनरिक नॉर्कियाविरुद्ध तुफान फटकेबाजी केली. माहीच्या फटकेबाजीदरम्यान त्याचा एकहाती षटकारही पाहायला मिळाला. धोनीने नॉर्कियाविरुद्ध दोन षटकार आणि दोन चौकार लगावत २० धावा केल्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसके ६ गडी गमावून १७१ धावाच करू शकला आणि दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला.