“मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवाला” आयपीएल सुरू झाली की हे वाक्य आपल्याला हमखास ऐकायला मिळतं. याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल मधील पहिला सामना २०१३ पासून एकदाही जिंकलेला नाही. लाखो करोडो चाहत्यांचा पाठिंबा असलेल्या मुंबई इंडियन्सचा प्रत्येक सामना पाहण्यासारखाच असतो. रोहित शर्माचे पुल शॉट्स, बुमराहची भेदक गोलंदाजी, सूर्याचे सुपला शॉट्स, फलंदाजीच्या खालच्या फळीतील पावर हीटर फिनिशर आणि डग आऊट मध्ये दिसणारी सचिन तेंडुलकरची झलक ही काही मुंबईच्या सामन्याची निवडक वैशिष्ट्य असतात.

इंडियन प्रीमियर लीग मधील चॅम्पियन संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. या टूर्नामेंट मधील मुंबईचा रेकॉर्ड पाहता तो एक यशस्वी संघ देखील आहे. २०१० पर्यंत एकही ट्रॉफी न जिंकलेल्या या संघाने २०१३ मध्ये आयपीएलची पहिली पहिली ट्रॉफी आपल्या नावे केली. २०१३ मधील या विजयानंतर मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरू झाली. २०१३ नंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यासह इंडियन प्रीमियर लीगची सर्वाधिक जेतेपद जिंकणारा संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख निर्माण झाली. सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे ज्यांनी मुंबईच्या बरोबरीने आयपीएलची पाच जेतेपद पटकावली आहेत.

दिग्गज खेळाडू आणि पाच जेतेपदे नावावर असतानाही मुंबई इंडियन्सच्या नावे एक आगळावेगळा इतिहास आहे. २०१३ पासून ते अगदी २०२४ पर्यंत मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना एकदाही जिंकलेले नाहीत. जणू काही पहिला सामना हरण्याचा मुंबई इंडियन्सला शापच आहे की काय, असा प्रश्न पडतो. २०१३ मध्ये मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होता आणि या सामन्यात मुंबई इंडियन्सला अवघ्या दोन धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून पहिला सामना हरण्याच्या मुंबई इंडियन्सच्या या ट्रेंडला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी विविध संघाकडून मुंबईचा संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला.

मुंबई इंडियन्सचा संघ पहिला सामना हरला असला तरीही पाच वेळा आयपीएलची ट्रॉफीही त्यांनीच जिंकून दाखवली आहे. या जेतेपदासोबतच पहिल्या सामन्यातील पराभवामुळे संपूर्ण हंगामाचे भवितव्य ठरत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. खेळातील सातत्य, योग्य निर्णय आणि शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती मुंबई इंडियन्सला चॅम्पियन संघ बनवते.

आयपीएलच्या १७व्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन संघासोबत झाला. आमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यामध्ये महिन्यातला पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या हातात असणारा विजय हिसकावून घेत गुजरात टायटन्सने मुंबईवर अवघ्या सहा धावांनी विजय मिळवला. अन या पराभवासह मुंबईचा गेल्या ११ वर्षांपासूनचा विक्रम कायम राहिला.