IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans: विदर्भचा युवा गोलंदाज यश ठाकूरने आयपीएल २०२४ मध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीसह लखनऊने आयपीएलमध्ये प्रथमच गुजरात टायटन्सचा पराभव केला. यंदाच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात पराभवाने झाली. पण त्यानंतर त्यांनी सलग तिसऱ्या सामन्यावर कब्जा केला आहे. लखनऊने गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर एकना स्टेडियमवर ३३ धावांनी पराभव केला. युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूर हा लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. ज्याने ३.५ षटकांमध्ये ३० धावा देत ५ विकेट घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यश ठाकूरने फक्त ५ विकेट्सच नाही घेतले. तर मेडेन षटक टाकत त्याच षटकात २ विकेट्सही मिळवल्या. गुजरातच्या कर्णधार शुबमन गिलला १९ धावांवर क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर विजय शंकर (१७), राशीद खान (०) आणि राहुल तेवतिया (३०) यांना झेलबाद करत माघारी धाडले. तर नूर अहमदला झेलबाद करत आपली ५ वी विकेटही घेतली आणि संघाला ३३ धावांनी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

कोण युवा गोलंदाज यश ठाकूर?
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. गुजरातविरूद्धच्या या सामन्यात खेळणारे दर्शन नळकांडे आणि उमेश यादव हे देखील विदर्भकडून क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. एमएस धोनीला विश्वचषक जिंकताना पाहून यश ठाकूरला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि त्याने विकेटकीपिंग करण्यास सुरूवात केली. प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला एकदा प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांनी गोलंदाजी करताना पाहिले आणि त्याला पुन्हा कधीही विकेटकीपिंग ग्लोव्हस घालू नकोस असे सांगितले. त्यावेळेस मला ‘धोनीसारखे’ व्हायचे आहे, असे यशने त्यांना सांगितले. हिंगणीकर यांना त्याला समजावणे कठीण होते.

प्रशिक्षकांनी त्याला समजावताना सांगितले की, धोनीसारखं होण्यासाठी यष्टिरक्षणापलीकडे आणखीही काही मार्ग आहेत. त्यांनी यशला धोनीकडून खेळाच्या इतर बाबी शिकून गोलंदाजी करताना त्याचा उपयोग करण्यास सांगितले. जो त्याच्या क्रिकेटमधील एक टर्निंग पॉइंट होता.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश त्याला आपला आदर्श मानतो. सुरुवातीच्या काळात उमेशच्या गोलंदाजीने प्रभावित झाल्यानंतर यशने वेगवान गोलंदाजी शिकण्याचा निर्णय घेतला. ज्याप्रमाणे उमेश यादवने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते, त्याचप्रमाणे उमेशच्या पावलावर पाऊल ठेवत यशला पुढे जायचे आहे. २५ वर्षीय यशने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. लखनऊने त्याला ४५ लाख रुपये खर्चून संघात घेतले.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबईविरूद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात यश ठाकूर देखील विदर्भ संघाचा एक भाग होता. त्याने फायनलमध्ये ६ आणि सेमीफायनलमध्ये ६ विकेट्स घेतल्या होत्या. रणजीच्या या मोसमात त्याने ७ सामन्यात २७ विकेट घेतले. त्याने २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६७ विकेट्स आणि ३७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५४ विकेट घेतले आहेत. तर टी-२० फॉरमॅटमध्ये यशने ४९ सामन्यांमध्ये ७४ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 who is yash thakur 5 wickets haul of vidarbha bowler in lsg vs gt match bdg
First published on: 08-04-2024 at 10:29 IST