जयपूर : गेल्या पाचही सामन्यांत विजय नोंदविलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे दमदार कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, गुरुवारी त्यांची राजस्थान रॉयल्सची गाठ पडणार आहे. सलग सहावा सामना जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळविण्याची मुंबईकडे संधी आहे.
अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबईच्या संघाने कामगिरी उंचावली आहे. पाच वेळच्या ‘आयपीएल’ विजेत्या मुंबई संघासाठी यंदाच्या हंगामाची सुरुवातही निराशाजनक ठरली होती. पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत मुंबईला हार पत्करावी लागली होती. मात्र, त्यानंतर योग्य संघनिवड, अचूक डावपेच आणि खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या आधारे मुंबईने सलग पाच सामने जिंकण्याची किमया साधली आहे.
दुसरीकडे, राजस्थान संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी असला, तरी ‘प्ले-ऑफ’ पात्रतेच्या त्यांच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आलेल्या नाहीत. परंतु त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे लागणार आहेत. राजस्थानने आतापर्यंत १० पैकी तीन सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या शतकी झंझावाताच्या जोरावर राजस्थानने गुजरात टायटन्सचा पराभव केला.
गुजरातने दिलेले २१० धावांचे आव्हान राजस्थानने २५ चेंडू राखूनच पूर्ण केले. त्यामुळे राजस्थानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असेल. त्यातच घरच्या मैदानावर सलग दोन सामने खेळण्याचाही राजस्थानला फायदा मिळू शकेल. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे १६ एप्रिलपासून सामना खेळलेला नाही. त्याच्या उपलब्धतेबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्याबाबत संभ्रम कायम आहे.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.