IPL 2025 Playoffs Scenario in marathi: आयपीएल २०२५ आता प्लेऑफच्या दिशेने जात आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरता सर्वच संघ प्रयत्नशील आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता प्लेऑफ गाठण्यासाठी ८ संघांमध्ये लढत होणार आहे. पंजाबचा संघ लखनौविरूद्ध सामन्यानंतर दुसऱ्या स्थानी पोहोचला. तर केकेआरच्या विजयाचाही लखनौला धक्का बसला आहे.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २३६ धावा करत २३७ धावांचे आव्हान लखनौला दिले. पण लखनौचा संघ २० षटकांत फक्त २०० धावाच करू शकला, यासह पंजाबने ३७ धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह पंजाब संघाने टॉप-४ मध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. ११ सामन्यात १५ गुणांसह पंजाब दुसऱ्या स्थानी आहे. तर लखनौचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. आरसीबीचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
पंजाब किंग्सच्या विजयाने ३ संघाच्या प्लेऑफच्या आशांना बसला धक्का
पंजाब किंग्सच्या विजयामुळे ८ पैकी ३ संघांना पात्र ठरण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघांचा समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबाद
पंजाब किंग्सचा संघ विजयामुळे १५ गुणांवर पोहोचला आहे. केकेआरविरूद्धचा त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला होता. पण आता पंजाब किंग्सचा संघ १५ गुणांवर पोहोचल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ सर्व 4 सामने जिंकूनही त्यांच्यापुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आता हैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशांना पूर्णविराम लागला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाताला प्लेऑफ गाठण्यासाठी आता सर्व सामने काही करून जिंकावे लागतील. याचबरोबर पंजाबने उर्वरित ३ सामन्यांपैकी एकच सामना जिंकावा अशी प्रार्थना करावी लागेल. याचबरोबर केकेआरला त्यांचा नेट रन रेटही सुधारावा लागणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौला प्लेऑफ गाठण्याकरता उर्वरित सर्व सामने जिंकायचे होते. पण पंजाबबरोबरचा सामना त्यांनी मोठ्या फरकाने गमावला आहे. त्यामुळे पंजाब संघ अजून एक सामना जिंकला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
आरसीबीने उर्वरित ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मुंबई इंडियन्सला प्लेऑफकरता ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील. तिन्ही सामने जिंकले तर टॉप-२ मध्ये राहता येईल. गुजरातला ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील. पंजाबला ३ पैकी १ सामना जिंकावा लागेल. दिल्लीला प्लेऑफकरता ४ पैकी ३ सामने जिंकावे लागतील.