IPL Playoffs Scenario For All Teams, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. इथून पुढे प्रत्येक सामना हा सर्वच संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. १० पैकी ८ संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील १८ सामने शिल्लक आहेत. मात्र, अजूनपर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करू शकलेला नाही. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बाजी मारली. या सामन्यानंतर प्लेऑफचं समीकरण गुंतागुंतीचं झालं आहे.

आयपीएल स्पर्धेत अग्रगण्य ४ स्थानी असलेले संघ हे प्लेऑफसाठी पात्र ठरतात. मात्र अग्रगण्य २ स्थानी असलेल्या संघांना फायनलमध्ये जाण्याच्या दोन संधी मिळतात. त्यामुळे प्रत्येक संघ पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असतो. चेन्नईला पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा फायदा झाला आहे. तर मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचं टेन्शन वाढलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह हे ५ संघ देखील गुणतालिकेत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी जाण्यासाठी दावेदार आहेत. तर चेन्नईने हा सामना जिंकला असता, तर या पाचही संघांना फायदा झाला असता. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल स्थानी आहे. येणारे सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी कायम राहून प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कसं आहे समीकरण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे पुढील सामने लखनऊ, हैदराबाद आणि कोलकाताविरूद्ध होणार आहेत. हे तिन्ही सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २२ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र, १ सामना जिंकूनही १८ गुणांसह हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित करू शकतो.

मुंबई इंडियन्स:

मुंबईचा संघ सध्या दुसरा १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईचे आणखी ३ सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जिंकून मुंबईचा संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील.

गुजरात टायटन्स:

गुजरात टायटन्स संघाला इथून पुढे ४ सामने खेळायचे आहेत. या ४ पैकी ३ सामने जिंकून गुजरातचा संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, चारही सामने जिंकले तर हा संघ २२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

पंजाब किंग्ज :

पंजाब किंग्जने आतापर्यंत १३ गुणांची कमाई केली आहे. इथून पुढे पंजाबचे ४ सामने शिल्लक आहेत. हे चारही सामने जिंकून पंजाबचा संघ २१ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर प्लेऑफ गाठण्यासाठी या संघाला ३ सामने जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्स:

दिल्ली कॅपिटल्सचे देखील ४ सामने शिल्लक आहेत. दिल्लीने आतापर्यंत १२ गुणांची कमाई केली आहे. इथून पुढे सर्व सामने जिंकले तर दिल्लीचा संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, ४ पैकी ३ सामने जिंकूनही हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्स:

सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. ५ सामने जिंकून या संघाने १० गुणांची कमाई केली आहे. लखनऊला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील.

कोलकाता नाईट रायडर्स:

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे देखील ४ सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत या संघाने ९ गुणांची कमाई केली आहे. उर्वरित ४ सामने जिंकून कोलकाताचा संघ १७ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कोलकाताला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर सर्व सामने जिंकावे लागतील.

सनरायझर्स हैदराबाद:

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत केवळ ६ गुणांची कमाई केली आहे. हा संघ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. इथून पुढील सर्व सामने जिंकून हा संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, त्यानंतरही या संघाला इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.