Jasprit Bumrah on Sachin Tendulkar Advice: जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने एकहाती भारतीय संघाच्या बाजूने सामने फिरवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये उशिरा संघात सामील झाला. बुमराहच्या संघात परतण्यामुळे मुंबईचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. पण बुमराह जेव्हा सुरूवातीला मुंबईच्या संघात दाखल झाला तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला एक सल्ला दिला आणि ज्यामुळे तो एक उत्कृष्ट गोलंदाज बनला.
जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून समोर आला आहे. बुमराह आता कसोटीमध्ये भारतासाठी २०० अधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. इतकंच नव्हे तर बुमराह संघाचा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. अंडर-१९ क्रिकेटमध्ये बुमराहची गोलंदाजी पाहिल्यानंतर, मुंबई इंडियन्सने २०१३ च्या आयपीएल हंगामासाठी त्याला त्यांच्या संघात सामील केले. यानंतर, बुमराहने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून उदयास आला.
जसप्रीत बुमराह २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाता सामील झाला होता. यादरम्यानचा किस्सा त्याने एका कार्यक्रमात सांगितला, “जेव्हा मी संघात आलो तेव्हा सचिन तेंडुलकरही खेळत होता आणि तो त्याचा शेवटचा हंगाम होता तर माझा पहिला हंगाम होता. जेव्हा तुम्ही १९ वर्षांचे असता आणि अशा वातावरणात येता, जिथे आजूबाजूला अनेक महान खेळाडू खेळत आहे. हे पाहून मी थोडा भारावून गेलो.”
पुढे बुमराह म्हणाला, “जेव्हा मी मुंबई इंडियन्स संघासाठी माझा पहिला सामना खेळणार होतो, तेव्हा सचिन तेंडुलकरने मला सांगितलं होतं; एखादी व्यक्ती किंवा तिचं नाव न पाहता फक्त एक फलंदाज म्हणून त्याला गोलंदाजी कर, त्याच्या या सल्ल्याची गोलंदाजी करताना मला मदत झाली.”
आयपीएल २०२५ च्या हंगामातील पहिल्या पाचपैकी चार सामने मुंबई इंडियन्सने गमावले होते. हंगामाच्या मध्यात, जसप्रीत बुमराह फिट होऊन संघात सामील झाला. तेव्हापासून, मुंबई संघाने आपला फॉर्म परत मिळवला आहे आणि सलग सहा सामने जिंकले आहेत आणि आता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सच्या या पुनरागमानमध्ये संघातील सर्व खेळाडूंचे तितकेच योगदान आहे. मुंबईसाठी, जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत १४० सामन्यांमध्ये १७६ विकेट्स घेतल्या आहेत.